पत्नीला अमानुष मारहाण करणारा शालिकराम गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:25 AM2019-08-29T01:25:59+5:302019-08-29T01:26:29+5:30
काजना-राजन्यातील रहिवासी शालीकराम रोडगेने पत्नी दीक्षावर अनन्वित अत्याचार केले. कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीला मारहाण हे अमानवी कृत्यच होय. त्यात दीक्षाला झालेली मारहाण ही गंभीर स्वरूपाची आहे. तिला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पत्नीला अमानुष मारहाण करणारा निर्दयी शालिकराम रोडगे याला अखेर लोणी पोलिसांनी बुधवारी अटक करण्यात यश मिळविले. त्याला नांदगाव खंडेश्वर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
काजना-राजन्यातील रहिवासी शालीकराम रोडगेने पत्नी दीक्षावर अनन्वित अत्याचार केले. कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीला मारहाण हे अमानवी कृत्यच होय. त्यात दीक्षाला झालेली मारहाण ही गंभीर स्वरूपाची आहे. तिला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या आईने मुलीला झालेल्या अमानुष मारहाणीची लोणी पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यावरून तिचा पती शालीकराम रोडगेविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ३२६ अन्वये गुन्हा नोंदविला. गेल्या तीन दिवसांपासून लोणी पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. मंगळवारी उशिरा रात्री शालिकराम मुलांना भेटण्यासाठी काजना येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयासमक्ष हजर केले.
दीक्षाला ज्या साहित्यांनी मारहाण केली, ते साहित्य जप्तीसाठी पोलिसांनी शालीकरामची पोलीस कोठडी मागितली. त्यानुसार न्यायालयाने शालिकरामला ३१ ऑगस्टपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली.
दीक्षावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड १४ मध्ये उपचार सुरू आहे. औषधोपचार सुरू असला तरी तिच्या मानसिक व शारीरिक वेदना अद्याप कमी झालेल्या नाहीत.
जीवे मारण्याची कलम दाखल होण्याची शक्यता
दीक्षाचे इर्विन चौकीतील पोलीस हवालदार गजानन सोनवणे व गणेश कावरे यांनी बयाण नोंदविल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश कुंडे यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. तो अहवाल बुधवारी चौकीतील पोलिसांना मिळाला. तिच्या अंगावरील जखमा या जिवे मारण्यास कारणीभूत ठरण्याइतपत असल्याचे अहवालात नमूद आहे. यामुळे गुन्ह्यात भादंवि कलम ३०७ वाढण्याची शक्यता आहे.
पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या शालिकराम रोडगेला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करायचे आहे. न्यायालयाने त्याला ३१ आॅगस्टपर्यंतची पोलीस कोठडी सुनावणी आहे.
- सुरेंद्र अहेरकर,
पोलीस निरीक्षक, लोणी ठाणे