अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात शंकरबाबा पापळकर यांना डी.लिट.ने सन्मानित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 07:15 AM2021-05-28T07:15:00+5:302021-05-28T07:15:01+5:30
Amravati news संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ शनिवार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजता आभासी पद्धतीने (ऑनलाईन मोड) संपन्न होत आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भूषवतील. केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण देतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ शनिवार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजता आभासी पद्धतीने (ऑनलाईन मोड) संपन्न होत आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भूषवतील. केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण देतील. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करतील. विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर स्वागतपर व प्रास्ताविक भाषण करणार असून, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती गुरुवारी पत्रपरिषदेतून देण्यात आली.
अनाथांचा नाथ शंकरबाबांना डि.लिट.
अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर, बेवारस, बालगृह हा आश्रम शंकरबाबांनी सुरू केला असून, १२३ दिव्यांग मुला-मुलींना जगण्याचा आधार मिळाला आहे. यापूर्वी त्यांनी दिव्यांग २४ मुला-मुलींचे लग्नसुध्दा लावून दिले आहे. १२३ दिव्यांग मुला-मुलींचे वडील म्हणून त्यांनी स्वत:चे नाव दिले आहे. वझ्झर येथील आश्रमात १५ हजार विविध प्रजातींचे वृक्ष त्यांनी लावले आहेत.
१५४ पदके, पारितोषिकांची लयलूट
या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना ११० सुवर्णपदके, २२ - रौप्यपदके व २२ - रोख पारितोषिके असे एकूण १५४ पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. दोन सुवर्ण पदकांसाठी आणि दोन रोख पारितोषिकांसाठी कोणीही पात्र ठरले नाही. या दीक्षांत समारंभात देण्यात येणाऱ्या पदके/पारितोषिकांसाठी मुलांमध्ये सर्वाधिक सुवर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोलाचा तेजस राठी याला सुवर्ण ५, रौप्य-१ व रोख पारितोषिक - १ व मुलींमध्ये सर्वाधिक सुवर्ण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची सारिका वणवे या विद्यार्थिनीला सुवर्ण- ६ व रोख पारितोषिक -१ घोषित झाले. ८३ विद्यार्थ्यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये ६५ मुली, तर १८ मुलांचा समावेश आहे.
---------------------