अच्युत महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात शंकर महाराजांना स्थान नाही
By Admin | Published: September 21, 2016 12:11 AM2016-09-21T00:11:24+5:302016-09-21T00:11:24+5:30
ज्ञानयोगी व तपस्वी संत शंकर महाराज यांचा चतुर्थ पुण्यतिथी महोत्सव तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील संस्थानमध्ये २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
२२ ला मौन श्रद्धांजली : उत्सवाला गालबोट नको, आश्रमाची भूमिका
अमरावती : ज्ञानयोगी व तपस्वी संत शंकर महाराज यांचा चतुर्थ पुण्यतिथी महोत्सव तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील संस्थानमध्ये २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या महोत्सवातील महत्त्वपूर्ण मौन श्रद्धांजली कार्यक्रमात २३ सप्टेंबरला शंकर महाराजांना टाळण्यात आले आहे. दरवर्षी शंकर महाराज या दिवशी उपस्थित राहतात, हे विशेष.
पिंपळखुटा आश्रमासंदर्भात सुरू असलेल्या नांदगावमध्ये महोत्सवाला गालबोट नको म्हणून ही भूमिका घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. गुरुवारी आयोजित मौन श्रद्धांजली कार्यक्रमात वर्धमनेरी येथील संत भानुदास महाराज, अंजनगाव सुर्जी येथील आचार्य जितेंद्रनाथ महाराज व कान्होली येथील अंबादास महाराज यांना निमंत्रित केले आहेत. पुण्यतिथी महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेत ही नावे छापण्यात आली आहेत. संत अच्युत महराजांच्या यापूर्वी झालेल्या तीनही पुण्यतिथी महोत्सवात शंकर महाराजांना अगत्याने बोलविण्यात आले होते. मात्र, यंदाच्या चतुर्थ पुण्यतिथी पर्वात मात्र शंकर महाराजांना टाळण्यात आले आहे.
बुवाबाजीला
स्थान नाही
अमरावती : शेंदूरजना बाजार येथे मोठ्या संख्येने असणाऱ्या मातंग समाज बांधवांनी शंकर महाराजांना कार्यक्रमात बोलविल्यास प्रचंड विरोध केला. पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रम मातंग समाजाचा ११ वर्षीय विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा नरबळी प्रकरणात गळा चिरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार नागपंचमीला घडला होता. यामुळे मातंग समाज प्रचंड प्रक्षुब्ध झाला आहे व उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी संत अच्युत महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात शंकर महाराजांना स्थान देण्यात आलेले नाही.
पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रमातील प्रकरणासंदर्भात जिल्ह्यात वादंग सुरू आहे. या पार्श्वभूमिवर महोत्सवाला कुठलेही गालबोट लागू नये, याकरिता यंदाच्या पुण्यतिथी पर्वात शंकर महाराजांना बोलविण्यात आलेले नाही.
- मनोहर निमकर,
सचिव, संत अच्युत महाराज संस्थान