शंकर पटावर बंदी
By Admin | Published: December 26, 2015 12:19 AM2015-12-26T00:19:42+5:302015-12-26T00:19:42+5:30
न्यायालयाने शंकरपटावर बंदी घालून शेतकऱ्यांच्या उत्साहावर विरजण लावले. शेतकरी बैलांना उत्कृष्ट खाद्य घालून त्याची पोटच्या मुलाप्रमाणे जोपासना करतो.
३०० वर्षांची परंपरा मोडीत
तळेगाव परिसरात नाराजी : शेतकऱ्यांच्या करमणुकीवर घाला
वसंत कुळकर्णी तळेगाव दशासर
न्यायालयाने शंकरपटावर बंदी घालून शेतकऱ्यांच्या उत्साहावर विरजण लावले. शेतकरी बैलांना उत्कृष्ट खाद्य घालून त्याची पोटच्या मुलाप्रमाणे जोपासना करतो. मात्र शंकरपटाच्या माध्यमातून त्यांची परवड होत होती. हा प्रकार थांबविण्यासाठी न्यायालयाने बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
शंकरपटाच्या निमित्ताने घडविलेला बैल उत्तम सशक्त चपळ व शेतीकामासाठी उत्कृष्ट असतेच बहुतांश शेतकरी अल्पवयीन बैलांना बदाम, दूध, लोण्याचे गोळे, कणकीचे उंडे व अंडी चारून धष्टपुष्ट व चपळ व गुळगुळीत बनवून शर्यतीत उत्तम धावण्यायोग्य बनवितात. त्याची दररोज साबणीचे आंघोळ घालून अंगाळा खराळा करतात. त्याच्या तब्येतीची यथायोग्य काळजी घेऊन वेळीच औषधोपचार करतात. त्याला थोडीशीही दुखापत होऊ नये, याची काळजी घेतात. तळहाताचे फोडाप्रमाणे जपतात. अशा बैलांना शेतकरी निर्दयीपणे कसा वागवू शकणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. एरवी एका बैलाची किंमत ३० ते ४० हजार रुपये असते. या घडविलेल्या बैलांची किंमत चारचाकी वाहनांएवढी असते. अशा बैलांची शेतकरी कधीही छड काढू शकत नाही. शेती कामासोबतच शर्यतीत आपला बैल कसा अव्वल ठरेल याच प्रयत्नात बळीराजा असतो. पूर्वीच्या काळात करमणुकीचे साधन उपलब्ध नसल्याने बैलांच्या स्पर्धा भरत होत्या. उत्कृष्ट जोडीसाठी हजारो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली जात होती. या स्पर्धेत शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहत होता. अशातूनच शंकर पटाची संकल्पना पुढे आली. बैलांच्या शर्यती, रेड्यांच्या टकरी, कोंबड्यांच्या झुंजी सुरू झाल्या. अशा बैलांची उत्तमरीत्या काळजी शेतकरी घेतो. बैलांची निगा राखण्यासाठी कामावर गडी माणूस ठेवला जातो. एकीकडे प्राण्यांची कत्तल होत असताना अशा कत्तल खान्यांवर शासनाने निर्बंध लावला नाही. शेकडो जनावरे कसायांच्या दावनीला बांधून कत्तल खान्याकडे नेली जातात. यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस घडत आहे.
तळेगावच्या पटाला गौरवशाली परंपरा
सुमारे ३०० वर्षांची परंपरा तळेगाव दशासर येथील श्ांकरपटाला लाभली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून नामांकित बैलजोड्या येथे दरवर्षी दाखल होत होत्या. स्थानिक कृषक सुधार मंडळाच्यावतीने या पटाचे जंगी आयोजन करण्यात येते. पटाच्या निमित्ताने परिसरात यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यात्रेत शेतीउपयोगी साहित्याची विक्रीसुध्दा केली जाते. या पटात बैलाला पुराणी टोचण्यास बंदी आहे. त्यामुळे बैलाच्या शरीराची काळजी येथे घेण्यात येते. परंतु न्यायालयाने पट भरविण्यावर यंदा बंदी घातल्याने तळेगावचा ऐतिहासिक शंकरपट नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.