शंकरनगरात घरफोडी : तीन लाखांवर ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:46 AM2019-06-12T01:46:00+5:302019-06-12T01:47:02+5:30
शंकरनगरात मंगळवारी उघडकीस आलेल्या घरफोडीच्या घटनेत अज्ञात चोरांनी एका घरातून तब्बल ३ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. राजकीय व वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे मुन्ना राठोड यांच्या घराला चोरांनी लक्ष केले असून, त्यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शंकरनगरात मंगळवारी उघडकीस आलेल्या घरफोडीच्या घटनेत अज्ञात चोरांनी एका घरातून तब्बल ३ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. राजकीय व वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे मुन्ना राठोड यांच्या घराला चोरांनी लक्ष केले असून, त्यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
शंकरनगरातील रहिवासी मुन्ना नारायणसिंह राठोड (५५) हे ६ जून रोजी कुटुंबीयांसह मुंबईला गेले होते. तेथून ते नजीकच्या पर्यटनस्थळी फिरायला गेले. मंगळवारी सकाळी परतीच्या प्रवासात असताना, त्यांना शेजारी राहणारे भुसारी यांचा कॉल आला. घराला कुलूप नसल्याचे भुसारी यांनी राठोड यांना सांगितले. त्यामुळे मुन्ना राठोड यांनी त्यांचे पुतण्या शक्ती नरेद्रसिंह राठोड यांना कॉल करून माहिती घेण्यास सांगितले. त्यानंतर राजापेठ पोलिसांना चोरी झाल्याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. श्वान पथक व ठसेतज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास मुन्ना राठोड यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यामध्ये चोरांनी कुलपाचा कडीकोंडा तोडून घरातील कपाटातून १ लाख ७६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व १ लाख ३६ हजारांची रोख असा ३ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचे नमूद केले.
या मुद्देमालाची चोरी
चोरी गेलेल्या मुद्देमालात राठोड यांच्या घरातून १२ हजारांचे एक घड्याळ, १ हजार २०० रुपयांचा सेटटॉप बॉक्स, १८ हजारांची चांदीची नाणी, २० हजारांच्या चार चांदीच्या वाट्या, २४ हजार रुपये किमंतीचे लहान बाळाच्या हाताचे सोन्याचे कडे व ताबीज, १२ हजारांच्या २ सोन्याच्या रींगा, ८ गॅ्रमचे मंगळसुत्र, ४ गॅ्रमची १२ हजार रुपये किमंतीची अंगुठी, ८०० ग्रॅमचे चांदीचे बॉऊल व सीसीटीव्हीची डिव्हीआर चोरांनी लंपास केला.