तळेगावचा शंकरपट
By admin | Published: January 17, 2015 12:57 AM2015-01-17T00:57:30+5:302015-01-17T00:57:30+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळात नानासाहेब देशमुख यांनी तळेगावात शंकरपटाला सुरूवात केली़ त्यानंतर बापुसाहेब देशमुख व आता कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख त्यांचा वारसा टिकवून आहेत़ ...
धामणगाव रेल्वे : स्वातंत्र्यपूर्व काळात नानासाहेब देशमुख यांनी तळेगावात शंकरपटाला सुरूवात केली़ त्यानंतर बापुसाहेब देशमुख व आता कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख त्यांचा वारसा टिकवून आहेत़ नानासाहेब देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावाच्या उत्तरेस गायरानात शंकरपट भरविण्यास सुरूवात केली़
त्यावेळी दो-दाणी एकदिवसीय शंकरपट होता़ दो-दाणी म्हणजे दोन दाणीवरून दोन बैलजोड्या एकाचवेळी सोडणे यातील जी जोडी कमी वेळेत अंतर पार करेल तिला बक्षीस असे स्वरूप आहे़ पुढे पटातील सहभागी जोड्यांची संख्या लक्षात घेता यात तीन गट पाडण्यात आले़
पूर्वी पटातील सुविधा व बक्षिसाची व्यवस्था करण्यासाठी बैलजोडी नोंदणी शुल्क चार आणे ठेवण्यात आले होते़ त्याकाळी वेळेची नोंद करण्यासाठी घड्याळ नव्हती़ आता मात्र आॅटोमॅटिक घड्याळाची व्यवस्था झाली आहे़ शतकाचा उंबरठा गाठणाऱ्या या शंकरपटात यापूर्वी रेड्याच्या टकरी, बोकडांच्या टकरी, कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जात असत. घोड्यांच्या शर्यती ही मनोरंजनाची साधने होती़ कालौघात हे सारे बंद झाले आहे़
कै. दादाजी देशमुख, कै. भाऊजी गोसावी, कै.गणपतराव बगाडे, बापुजी बारी, रामकृष्ण लोहार, आबासाहेब पांडे, तुकाराम शेंद्रे़ मसुदा डेहनकर, पंजाबराव गुल्हाने, भुरूभाई अब्दुल्ला खान यांनी हा शंकरपट त्या काळात नेटाने चालविला होता़
१९४२ मध्ये या शंकरपटाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला़ तत्कालीन जिल्हाधिकारी ले़अॅलर्ट अध्यक्षस्थानी होते़ १९५४ मध्ये कृषकसुधार मंडळाची स्थापना झाली आणि सोसायटी अॅक्टनुसार नोंदणी करून शंकरपटाची सूत्रे मंडळाकडे आली़
४५० फू ट अंतरावर धावतेय जोडी
जोडी धावण्याचे अंतर ४५० फूट आकारण्यात येते़ जोडी धावण्याला सुरूवात करते. त्या ठिकाणी लांब दोरा बांधला जातो़ शेवटच्या टोकाला दुसरा आडवा धागा बांधला जातो़ झेंडी दाखवून पटाला सुरूवात होताच जोडीने पहिला धागा तोडताच घड्याळावर वेळेची नोंद होते. पटाचे अंतर पार करताच दुसरा दोरा तुटतो़ त्याचीही नोंद घड्याळात होते़ यावरून कोणती बैलजोडी किती वेळात धावली याची नोंद घेतली जाते़ पहिला किंवा शेवटचा दोरा न तोडता जोडी धावली तर ती स्पर्धेतून बाद होते़
२० रूपयांचा चिवडा
येथील शंकरपटात चिवडा हा प्रसिध्द आहे़ फुटाणे, मुरमुरे, शेंगदाणे असा कच्चा चिवडा खाण्यासाठी पटशौकीन येतात़ २० रूपयांच्या चिवड्यात एका वेळचे भोजन होेते़ चिवड्यासाठी तब्बल ४० ते ५० ट्रक मुरमुरे येथे आणतात़ लागणारे साहित्य हे ठोक भावात दुकानदार खरेदी करून आणत असल्यामुळे येथे विक्री होणाऱ्या चिवड्यातून एक दुकानदार चार दिवसांत आठ ते दहा हजार रूपयांचा व्यवसाय करीत असल्याचे सांगण्यात येते.
कोट्यवधींची उलाढाल
वर्षभर शेतीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी येथील यात्रा महोत्सवात शेतकरी करतात़ पोळ्यासाठी बैलांचा साज, डवरणी, वखरणी, जू, अशा लाकडी साहित्याची खरेदी करण्यासाठी विदर्भातील शेतकरी आले आहेत़ या यात्रेत खात्रीचे साहित्य मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़ तीन ते चार दिवसांत कोट्यवधी रूपयांची उलाढाल या यात्रेत होते़
बैलजोडीची किंमत सात लाख
पटशौकीन शेतकरी आपल्या पटाच्या बैलजोडीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात़ दररोज त्यांची अंघोळ घालणे, लोण्याचे गोळे खाऊ घालणे व दूध पाजणे हे काम पटशौकीन करतात़ पटात सहभागी होणाऱ्या एका बैलाची किंमत एक ते तीन लाख रूपये असते़ म्हणजे बैलजोडीची किंमत पाच ते सात लाखांपर्यंत असते. यावरून या बैलजोडीच्या व्यवस्थेची कल्पना येते.