बहिरम यात्रेत आजपासून शंकरपट; चेंडू-सैराट दाखल, हार्दिक कृणाल पांड्या येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:05 AM2023-01-21T11:05:24+5:302023-01-21T11:07:31+5:30
मध्य प्रदेशसह राज्यभरातून बैलजोड्या धावणार
परतवाडा (अमरावती) : बहिरम यात्रेत २१ जानेवारीपासून शंकरपटास सुरुवात होत आहे. या शंकरपटात सहभागी होण्याकरिता चेंडू-सैराट ही बैलजोडी बहिरममध्ये दाखल झाली. हार्दिक पांड्या-कृणाल पांड्यादेखील येणार आहे. याहीपेक्षा वेगवेगळी नावे शंकरपटात धावणाऱ्या बैलांची आहेत. या शंकरपटात मध्य प्रदेशसह राज्यभरातून बैलजोड्या धावणार आहेत.
शंकरपटाकरिता आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात असून अंकुश जंजाळसह उत्साही मंडळी त्याकरिता राबत आहेत. राबणाऱ्यांमध्ये लहान मोठ्यांसह सर्वांचा समावेश आहे. शनिवारी या शंकरपटाच्या उद्घाटनाला आमदार बच्चू कडू व आमदार राजकुमार पटेल यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
घड्याळजी येणार
राज्यभर शंकरपटांचे ठोके नोंदविणारे घड्याळजी शंकरपटाच्या निमित्ताने बहिरम यात्रेत दाखल होत आहेत. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील येहळे गावचे राजाभाऊ संभाजी मंदाडे नामक घड्याळजी १९७९ पासून शंकर पटाचे ठोके नोंदवित आहेत़. राजाभाऊंची तारीख आधी आणि नंतरच शंकरपटाची तारीख निश्चित होते. शंकरपटात वायुवेगाने धावणाऱ्या बैलाने कापलेल्या अंतराची अचूक वेळ मोजण्यासाठीच राजाभाऊंना आवर्जून बोलावण्यात येते.