पुन्हा संचारणार शंकरपटाचा उत्साह
By admin | Published: April 13, 2017 12:15 AM2017-04-13T00:15:01+5:302017-04-13T00:15:01+5:30
शंकरपटावर घालण्यात आलेली बंदी मागे घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रयत्न केले होते.
तळेगावात आनंद : कायद्याचे सावट निवळले, ऐतिहासिक स्पर्धेला संजीवनी
तळेगाव दशासर : शंकरपटावर घालण्यात आलेली बंदी मागे घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रयत्न केले होते. यानिर्णयामुळे तळेगावच्या शंकरपटास गतवैभव प्राप्त होणार आहे. मागील तीन वर्षांपासून तळेगावचा प्रसिद्ध शंकरपट भरला नसल्याने नैराश्याचे वातावरण होते. विशेष म्हणजे यामुळे शेतीपुरक व्यवसायावरही मोठा परिणाम झाला होता.
विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या तळेगावच्या शंकरपटावर तीन वर्षांपूर्वी न्यायालयाच्या निर्णयामुळे बंदी आली होती. येथील शंकरपटाला शंभर वर्षांचा इतिहास आहे. कृषक सुधार मंडळाद्वारे सुरू करण्यात आलेला हा ऐतिहासिक शंकरपट दरवर्षी संक्रातीच्या मुहूर्तावर १५ ते १८ जानेवारीपर्यंत येथील बसस्थानकाच्या उत्तरेस असलेल्या २७ एकर शासकीय जागेत भरविण्यात येतो. देशातील पहिला महिला शंकरपट देखील याच ठिकाणी दहा वर्षांपूर्वी भरविण्यात आला होता. तेव्हापासून येथील शंकरपटात महिला देखील सहभागी होत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात कुस्ती स्पर्धा व पटेश्वर यात्रा देखील भरविली जाते.
केवळ स्पर्धेसाठीच नव्हे तर या शंकरपटाच्या माध्यामतून अनेक शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्यावर येथे येणाऱ्यांचा भर असतो. शंकरपटात शेतीपयोगी सर्वच साहित्य, करमणुकीची साधने, बैलबाजार, पशू प्रदर्शनी, बचतगट स्टॉल आदींचा भरणा असल्याने यापटाला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त होते आणि येथे कोट्यवधींची उलाढालही होते.
शासनाने २७ एकर शासकीय जमीन दहा दिवसांसाठी शेतकऱ्यांशी संबंधित कार्यक्रमासाठी राखून ठेवली आहे. आ. जगताप यांच्या प्रयत्नाने यात्रेचे उत्पन्न कृषक सुधार मंडळास मिळवून दिले आहे. (वार्ताहर)
बैलांवर अन्याय नाही
राज्यातील पटशौकीन आपल्या नामांकित जोड्या घेऊन येथे लवाजाम्यासह डेरेदाखल होतात. तसेच लांबून व्यापारी, ग्राहक व शेतकरी लाखोंच्या संख्येने पटात सहभागी होत असतात. या शंकरपटात बैलांवर कोणताही अन्याय होत नाही व जोडी हाकताना पुराणी, आरू व काठीचा वापर करण्यास धुरकऱ्यास सक्त मनाई कृषक सुधार मंडळाने केली आहे.
शंकरपट सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. परंतु, पटविरोधक सुप्रीम कोर्टात गेल्यास अडचण येऊ नये. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांना विश्वासात घ्यावे.
- आ.वीरेंद्र जगताप,धामणगाव
हा पट अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्याचे भूषण आहे. या शंकरपटाला आजपर्यंत कोणतेही गालबोट लागले नाही. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे.
- रावसाहेब देशमुख,
कृषक सुधार मंडळ