शरद पवारांनी बच्चू कडूंचं निमंत्रण स्वीकारलं; महाविकास आघाडीत येण्याबाबतही बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 06:57 PM2023-12-27T18:57:38+5:302023-12-27T19:05:39+5:30
राज्यासह राष्ट्रीय पातळीवरीलही भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेकदा टीकेचे बाण सोडले जातात.
अमरावती - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये पहिल्यांदा ज्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली तेच मंत्री झाले. दुसऱ्या यादीतील मंत्री अद्यापही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. त्यात, माजी मंत्री बच्चू कडू यांनाही मंत्रीपदासाठी ताटकळत बसावे लागले. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू सरकारविरुद्ध आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांनी शेतकरी व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यातच, आता महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बच्चू कडूंचं निमंत्रण स्वीकारल्याने काही राजकीय प्रश्न उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात स्वत: शरद पवार यांनी खुलासा केला आहे.
राज्यासह राष्ट्रीय पातळीवरीलही भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेकदा टीकेचे बाण सोडले जातात. मात्र भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात शरद पवारांवर जोरदार स्तुतीसुमने उधळली आहेत. "विविध क्षेत्रातील गुणवत्ताधारकांच्या पाठीशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता उभं राहणारं महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे शरद पवार," अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी शरद पवारांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. शरद पवार आज अमरावती दौऱ्यावर असून याच दौऱ्यात आमदार बच्चू कडू यांनी त्यांना चहासाठी निमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे शरद पवार हेही त्यांचं निमंत्रण स्वीकारुन त्यांच्याकडे जात आहेत.
एखाद्या विधानसभा सदस्याने चहासाठी बोलावल्यावर जायला हवं. त्यांनी जाता-जाता माझ्याकडे चहासाठी येण्याचं निमंत्रण दिलं, ते निमंत्रण मी स्वीकारलं असून तिथे जात आहे. मात्र, या भेटीमागे कुठलाही राजकीय हेतू नाही. बच्चू कडू महायुतीत नाराज आहेत, ते महाविकास आघाडीत येणार असतील तर तुम्ही त्यांना घ्याल का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर, कशावरुन, तुमच्याकडे तशी माहिती आहे का? असा प्रतिप्रश्न शरद पवारांनी केला. त्यामुळे, बच्चू कडू महाविकास आघाडीत जातील या प्रश्नावरील चर्चेला शरद पवारांनी पूर्णविराम दिला.
गडकरींकडून शरद पवारांवर स्तुतीसुमने
नितीन गडकरी आणि शरद पवार हे महाराष्ट्रातील दोन्हीही नेते आपल्या पक्षविरहीत मैत्रीसाठी ओळखले जातात. गडकरी आणि पवार आज डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एकत्र आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने १२५ रुपयाचे नाणे जारी केले. या नाण्याचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसंच यावेळी यूपीए सरकारमध्ये केंद्रीय कृषीमंत्री राहिलेल्या शरद पवार यांना शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यावेळी नितीन गडकरी यांनी शरद पवारांचं कौतुक करत या पुरस्कारासाठी पवार यांच्या उंचीची माणसं दरवर्षी कुठून मिळणार, असं म्हटलं आहे. "पंजाबराव देशमुख यांच्याकडे असणारी तळमळ आणि व्हिजन शरद पवार यांच्याकडेही आहे. राजकीय धुळवड सुरू असते. मात्र, या राजकीय धुळवडीत डॉ. पंजाबराव देशमुख आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचं नाव व कार्य सामान्यांच्या कायम लक्षात राहतं," असं गडकरी म्हणाले.