शरद पवार पंतप्रधान, तर जयंत पाटील राज्याचे ....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:13 AM2021-02-07T04:13:05+5:302021-02-07T04:13:05+5:30
फोटो पी ०६ अनिल कडू फोल्डरमध्ये जयंत पाटील नावाने अनिल कडू परतवाडा : शरद पवार देशाचे पंतप्रधान, तर जयंत ...
फोटो पी ०६ अनिल कडू फोल्डरमध्ये जयंत पाटील नावाने
अनिल कडू
परतवाडा : शरद पवार देशाचे पंतप्रधान, तर जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत. ही इच्छा व्यक्त करणाऱ्या आठव्या वर्गातील चिमुकल्याला ‘असे काही बोलू नको, मी तुझ्या पाया पडतो, असे म्हणून खुद्द जयंत पाटलांनी मध्येच थांबवले. त्या चिमुकल्याच्या मुखातील वाक्यही त्यांनी पूर्ण होऊ दिले नाही.
‘मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटत“, असे काही दिवसांपूर्वी बोलणारे जयंत पाटील, यानंतर उमटलेल्या प्रतिक्रियांनी कमालीचे धास्तावलेले दिसलेत. त्यांनी त्या चिमुकल्याला त्याची इच्छा व्यक्त करू न देता तू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरिता काम करू इच्छितो का ? तू वेळ देऊ शकशील का, असा प्रतिप्रश्न केला. तेव्हा यदुराज खडके नामक या चिमुकल्याने शाळा आणि शिकवणीच्या वेळेनंतर ते शक्य असल्याचे व्यासपीठावरूनच स्पष्ट केले.
राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या“राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे‘च्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील ४ फेब्रुवारीला अचलपूर बाजार समितीच्या सभागृहात हजर झाले होते. तेव्हा एकच गर्दी उसळली होती. या गर्दीत त्यांना दिवसाच पत्रकारांना गुडनाईट करावे लागले. कार्यकर्त्यांशी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना जयंत पाटलांच्या क्लासमध्ये अनेकजण अनुत्तीर्ण झालेत. जयंत पाटलांनी सभागृहात हात वर करायला लावून संबंधितांची उपस्थितीही घेतली. दरम्यान पदाधिकाऱ्यांसह मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे यांनी जयंत पाटलांनी ताकद मागितली. केवलराम काळे यांनी आपल्या पराभवाची कारणमीमांसा आक्रमक पद्धतीने अगदी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली.
बॉक्स
कोल्हापूरी बांधरा
अचलपूर मतदारसंघातील तोंडगावचा कोल्हापुरी बंधारा याप्रसंगी गाजला. २५ वर्षांत या कोल्हापुरी बंधाऱ्यात एकदाही पाणी थांबवले गेले नाही. पाणी अडवायला सध्या लोखंडी प्लेट नाहीत, असे जयंत पाटलांना व्यासपीठावरून सांगण्यात आले. या अनुषंगाने महिन्यांपूर्वी भेट घेऊन दिल्या गेलेल्या निवेदनाची आठवणही याप्रसंगी जयंत पाटलांना करून देण्यात आली.
बॉक्स
कॉफी मिळाली नाही
अचलपूर बाजार समितीच्यावतीने व्यासपीठावर जाऊन जयंत पाटलांना बाजार समितीत येण्याचे निमंत्रण दिले गेले. परिवार संवाद कार्यक्रम संपल्यानंतर संजय खोडकेंसह जयंत पाटील बाजार समितीत पोहचलेत. या सत्कारादरम्यान जयंत पाटील यांनी कॉफी मागितली. कॉफी पाजणार की नाही, असा प्रश्नही केला. पण कॉफी मागूनही ती जयंत पाटलांना मिळालीच नाही. कॉफी न घेता तेथून निघुन गेल्यानंतर मात्र कॉफी तेथे पोहचली आणि जयंत पाटील व उशिराने पोहचलेली ती कॉफी चर्चेत आली.
बॉक्स
चिंता वाढली
या संवाद यात्रेला गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होेते. त्यांनीही कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. फोटोही काढलेत. तेथून ते मानस कन्येच्या भेटीला पापळकरांकडे गेलेत. दरम्यान ते कोरोना संक्रमित निघालेत. संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे अचलपुरात चांगलीच चिंता वाढली आहे.