बांग्लादेशातील संत्र्यावरील आयात कर कमी करण्यासाठी शरद पवारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:18+5:302021-08-01T04:12:18+5:30
फोटो - जरूड ३१ ओ माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आ. देवेंद्र भुयार यांनी घेतली भेट प्रशांत काळबेंडे - ...
फोटो - जरूड ३१ ओ
माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आ. देवेंद्र भुयार यांनी घेतली भेट
प्रशांत काळबेंडे - जरूड : बांग्लादेशने संत्र्यावर लादलेला आयात कर कमी करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली.
संत्राउत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून वर्षाला सरासरी दीड ते दोन लाख मेट्रिक टन संत्री अमरावती बांग्लादेशात निर्यात होतात. बांग्लादेशने २०२१-२२ पासून आयात कर वाढविल्यामुळे शेतकऱ्यांना संत्री निर्यातीत अडचण निर्माण झाली आहे. यामुळे ‘विदर्भाच्या कॅलिफोर्निया’तील संत्री विदेशात पाठविणे कठीण झाले आहे. बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात मोर्शी-वरूड तालुक्यातून संत्र्याची निर्यात केली जाते. बांग्लादेशने आयात कर मोठ्या प्रमाणात वाढविल्याने संत्राउत्पादक शेतकरी व निर्यातदारांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने घोषित केलेला पथदर्शक फलोत्पादन क्लस्टर विकास कार्यक्रम केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयामार्फत राष्ट्रीय बागवानी मंडळाद्वारे फलोत्पादन समूह विकास कार्यक्रमामधून (हॉर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलेपमेंट प्रोग्राम) देशातील विविध फळपिकांची उत्पादकता वाढविण्यासोबतच त्याचे मूल्यवर्धन होण्याच्या उद्देशाने हॉर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलेपमेंट प्रोग्रामची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत या कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. या मुख्य क्लस्टरमधून विदर्भाचे प्रमुख फळपीक असलेल्या संत्र्याला वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल. यामुळे पिकाचा पथदर्शक फलोत्पादन क्लस्टर विकास कार्यक्रमात समावेश करण्यात यावा, अशी मागणी खासदार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली.
संत्रा पिकाला बांग्लादेश सरकारने लावलेला अतिरिक्त आयात कर कमी करण्यासाठी खासदार शरद पवार यांनी बांगलादेश सरकारसोबत चर्चा करून पत्रव्यवहार केल्यामुळे बांग्लादेश सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील संत्राउत्पादक शेतकरी व निर्यातदारांना निश्चित न्याय मिळणार असल्याचे आश्वासन खासदार शरद पवार यांनी हर्षवर्धन देशमुख, आ. देवेंद्र भुयार यांना दिले.
खासदार शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान संत्राउत्पादकांच्या समस्या व परिस्थिती अवगत केली. आयात कर कमी करण्याचा निर्णय बांग्लादेशला घ्यायचा आहे. खासदार शरद पवार निश्चितच संत्राउत्पादकांची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याकरिता सहकार्य करतील, अशी ग्वाही आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.