अंबा-एकवीरा देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:00 AM2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:01:12+5:30
पहाटेपासूनच भाविकांनी अंबा-एकवीरा देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. श्री अंबादेवी संस्थानात रविवारी पहाटे ४ वाजता संस्थानचे कोषाध्यक्ष रवींद्र कर्वे त्यांच्या पत्नी शुभांगी कर्वे यांच्या हस्ते अंबा देवींची घटस्थापना करण्यात आली. यानंतर दोन तास विधीवत पूजा व आरती झाली. ध्वजारोहणाचा मान सचिव डॉ. अतुल आळशी त्यांच्या पत्नी अनुराधा आळशी यांना मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भाचे आराध्य दैवत अंबा-एकवीरा देवीच्या मंदिरात रविवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता अंबादेवी मंदिरात व सकाळी ८.३० वाजता एकवीरा देवी मंदिरात विधीवत पूजेनंतर घटस्थापना झाली.
पहाटेपासूनच भाविकांनी अंबा-एकवीरा देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. श्री अंबादेवी संस्थानात रविवारी पहाटे ४ वाजता संस्थानचे कोषाध्यक्ष रवींद्र कर्वे त्यांच्या पत्नी शुभांगी कर्वे यांच्या हस्ते अंबा देवींची घटस्थापना करण्यात आली. यानंतर दोन तास विधीवत पूजा व आरती झाली. ध्वजारोहणाचा मान सचिव डॉ. अतुल आळशी त्यांच्या पत्नी अनुराधा आळशी यांना मिळाला. यावेळी अध्यक्ष विद्या देशपांडे यांच्यासह संस्थेच्या विश्वस्त उपस्थित होते, अशी माहिती विश्वस्त राजेंद्र पांडे यांनी दिली. श्री एकवीरा देवी संस्थानात एकवीरा देवीची घटस्थापना सकाळी ८.३० वाजता संस्थेचे विश्वस्त रवींद्र मराठे यांनी सपत्नीक केली. ध्वजारोहण पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर त्यांच्या पत्नी रंजना बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवीन अन्नक्षेत्र इमारतीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष रमेश गोडबोले यांच्या हस्ते झाले. तीन हजार भाविकांना रोज अन्नदान संस्थेतर्फे करण्यात येणार आहे, असे सचिव शैलेश वानखडे म्हणाले.
झीरो गारबेजचा पहिला प्रकल्प एकवीरा संस्थानात
महापालिका आयुक्त संजय निपाणे यांचा घनकचऱ्यापासून खतनिर्मिती हा झीरो गारबेजचा पहिला प्रकल्प एकवीरा देवी मंदिरात रविवारपासून राबविण्यात येत आहे. यासाठी विश्वस्त अनिल खरैया व शैलेश वानखडे यांनी पुढाकार घेतला. फुले, कचरा खड्ड्यात टाकून त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती होणार आहे.
अंबादेवी मंदिरात अन्नदान
येथील कीर्तन हॉलमध्ये रोेज दीड ते दोन हजार भाविकांना अन्नदान करण्यात येणार आहे. रोज विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येथे ८९ भजनी महिला मंडळांनी भजन करण्यासाठी नोंदणी केली आहे. श्री संत अच्युत महाराजांचे शिष्य हभप सचिन देव यांचे प्रवचन रविवारी सकाळी पार पडले. रोज या ठिकाणी २४ तास सेवा करण्यासाठी नऊ पुजारी नियुक्त करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा 'वॉच' राहणार आहे. तसेच लाडू, प्रसाद वाटप व इतर सेवेसाठी २० महिला सेवेत राहणार आहेत. दुपारी १२ वाजता भोग आरती व रात्री १०.३० वाजता आरती व पूजेचे नियोजन आयोजन समितीने केले आहे. ती आरती रात्री १२.३० वाजेपर्यंत चालणार असल्याची माहिती राजेंद्र पांडे यांनी दिली. मंदिराबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.