शेअर गडगडले, अमरावतीकर ब्रोकर्सही चिंताग्रस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 07:00 AM2021-12-21T07:00:00+5:302021-12-21T07:00:03+5:30
Amravati News भांडवली बाजारामध्ये सोमवारी पुन्हा एकदा कोरोनाची दहशत दिसून आली. ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव आणि पुन्हा निर्बंध लागू होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सोमवारी शेअर बाजार एक हजारांहून अधिक अंकांनी गडगडला.
अमरावती : मुंबई शेअर बाजारावरही कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. भांडवली बाजारामध्ये सोमवारी पुन्हा एकदा कोरोनाची दहशत दिसून आली. ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव आणि पुन्हा निर्बंध लागू होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सोमवारी शेअर बाजार सुरुवातीच्या काही तासांमध्येच एक हजारांहून अधिक अंकांनी गडगडला. सेन्सेक्स १३०० अंशांनी गडगडला असून निफ्टीचा निर्देशांकही १६ हजार ६०० च्या खाली गेला. या घसरगुंडीने अमरावतीकर ब्रोकर्सही चिंताग्रस्त झाले आहेत.
अमरावती शहरातील अनेकांनी शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे शेअर्स ब्रोकर्स तथा इन्व्हेस्टमेंट फर्मदेखील आहेत. सोमवारी पहिल्या काही तासांमध्ये बाजार गडगडल्याने त्याचा परिणाम येथेदेखील पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री केल्याने शेअर बाजार गडगडला. आठवड्याची सुरुवातच गुंतवणुकदारांसाठी अशाप्रकारे वाईट झाली.
पैसे काढून घेण्याकडे कल
जगभरामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याअनुषंगाने पुन्हा एकदा निर्बंध लागतील, या भीतीने जगभरातील शेअर मार्केटमध्ये गुंतविलेले पैसे काढून घेण्याचाच कल दिसून येत आहे.
मार्केटमध्ये प्रॉफिट बूकिंग झाले. मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री केल्याने शेअर बाजार गडगडला. अमरावतीमध्येही अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
नीलेश मंडलेचा, शेअर ब्रोकर, अमरावती