होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत अमरावतीच्या 'शाश्वत'चा नवा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:06 AM2017-11-15T10:06:14+5:302017-11-15T10:10:39+5:30
राज्यभरात केवळ सात टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकलेल्या आणि शास्त्रज्ञ निर्मितीच्या प्रक्रियेत विशेष प्रतिष्ठेच्या गणल्या जाणाऱ्या 'होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षे'त अमरावती येथील शाश्वत शाळेच्या सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : राज्यभरात केवळ सात टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकलेल्या आणि शास्त्रज्ञ निर्मितीच्या प्रक्रियेत विशेष प्रतिष्ठेच्या गणल्या जाणाऱ्या 'होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षे'त अमरावती येथील शाश्वत शाळेच्या सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. ९३ टक्के विद्यार्थ्यांनी यश संपादन करून देशपातळीवर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
ही परीक्षा मुंबई सायन्स टीचर असोसिएशनतर्फे आयोजित केली जाते. कुठलेही पुस्तक त्यासाठी उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांमधील शास्त्रोक्त दृष्टिकोन आणि वैज्ञानिक विचारसरणी तपासणे हा परीक्षेचा हेतू असतो. पाठांतराऐवजी खेळातून विज्ञान शिकवून 'शाश्वत'ने ही किमया साधली. त्यांच्या या यशस्वी शैक्षणिक मॉडेलची देशभरातील शिक्षण क्षेत्रात विशेष दखल घेतली गेली आहे. तीन पातळ्यांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी ४० पैकी १० विद्यार्थी वरिष्ठ पातळीसाठी निवडले गेले आहेत. विद्यार्थ्यांचा शंभर टक्के सहभाग नोंदविण्याचे धारिष्ट्य दाखविणारी राज्यातील ही एकमेव शाळा ठरली. शाळेचा एकत्रित निकाल २५ टक्के आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अदिती वरहडे ही अव्वल ठरली. अनुष्का पोटोडे, मृण्मयी जोशी, मधुर लिखमणी, सुबोध कानबाले, श्रेया साकला, मेघना बजाज, प्लक्षा पांडे, राज आंचलिया, आदित्य म्हामर्डे यांचाही यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे.
विद्यार्थ्यांना वैशाली ठाकूर, हिमानी राठी, सरिता खत्री, अनुप्रिया मंडकमारे यांचे मार्गदर्शन, तर संस्थापिका अमृता गायगोले, दिल्लीच्या नारायणा आय.आय.टी.अकॅडमीतील तज्ज्ञ शिक्षक आलोक कुमार, टाटा इन्स्टिट्युटचे माजी शास्त्रज्ञ डॉ.आनंद घैसास, संजय पांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विनाशुल्क स्पर्धा परीक्षा विभाग
च्आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शहीद जवानांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देऊन सामाजिक बांधिलकी जोपासणाºया या शाळेने स्पर्धा परीक्षा विभागही सुरू केला आहे. यात कुठलेही अतिरिक्त शुल्क न आकारता इयत्ता पाचवी व आठवीसाठी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता सहावी व नववीसाठी डॉ.होमी भाभा जुनिअर साइन्टिस्ट स्पर्धा, इयत्ता दहावीसाठी एनएसटीएसई परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
प्रत्येक विद्यार्थ्यात लपलेला आईन्टसाईन जागा करणे, हा या परीक्षेमागील हेतू होता. आम्ही सर्व मिळून नवा विक्रम नोंदवू शकलो याचा आनंद आहे.
- अमृता अतुल गायगोले, संस्थापक, शाश्वत स्कूल, अमरावती