हिट अँड रन कायद्याविरोधात वाहनचालकांचे मुंडण; जिल्हा वाहनचालक कृती समितीचे इर्विन चौकात साखळी आंदोलन
By उज्वल भालेकर | Published: January 11, 2024 07:53 PM2024-01-11T19:53:52+5:302024-01-11T19:54:06+5:30
हिट अँड रन कायद्याविरोधात शहरातील वाहनचालकांनी गुरुवारी मुंडण आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला.
अमरावती: हिट अँड रन कायद्याविरोधात शहरातील वाहनचालकांनी गुरुवारी मुंडण आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत टप्प्या-टप्प्याने विविध आंदोलन करण्याचा निर्णय जिल्हा वाहनचालक कृती समितीने घेतला आहे. मागील आठ दिवसांपासून कृती समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे.
केंद्र सरकारने वाढते अपघात आणि यात होणारे मृत्यू लक्षात घेता ‘हिट अँड रन’ कायदा लागून करून यामध्ये वाहनचालकांवर कडक शिक्षेची तरतूद केली आहे. ही तरतूद वाहनचालक व मालक यांच्यावर अन्याय करणारी असून हा कायदा सरकारने मागे घ्यावा, यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरात ट्रक आणि टॅँकर चालकांनी बेमुदत संप पुकारला होता. या संपाच्या दुसऱ्याच दिवशी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी सरकारने चर्चा करून हा कायदा अजूनही लागू झालेला नसल्याचे सांगत कायदा लागू करण्यापूर्वी संघटनेशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेतला. परंतु अमरावती जिल्हा वाहनचालक कृती समितीने जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी या संपातील सहभागी चालकांनी मुंडण करून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविला. यावेळी २५ ते ३० चालक मुंडण आंदोलनात सहभागी झाले होते.