तिला सांगताही येईना...; गतिमंद महिलेशी दुष्कृत्य!
By प्रदीप भाकरे | Published: February 3, 2023 07:58 PM2023-02-03T19:58:23+5:302023-02-03T19:59:30+5:30
पोलीस पाटील महिलेने नोंदविली तक्रार : न्यायालयाकडून घेतली परवानगी.
अमरावती: एका गतिमंद महिलेशी दुष्कृत्य झाले असावे, अशा प्राथमिक माहितीवरून वरूड पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरूध्द विनयभंग व शारिरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. २ फेब्रुवारी रोजी रात्री ८.४२ च्या सुमारास गुन्ह्याची नोंद करताच वरूड पोलिसांनी गुरूवारी त्या पीडितेची वैद्यकीय तपासणी देखील करून घेतली. याबाबत वरूड तालुक्यातील एका पोलीस पाटील महिलेने तक्रारीसाठी पुढाकार घेतला. त्याची वरूड पोलिसांकडून तातडीने दखल घेण्यात आली.
वरुड तालुक्यातील पोलीस पाटील महिलेच्या तक्रारीनुसार, गतवर्षी दिवाळीनंतर अंदाजे ३५ वर्षे वयाची एक अनोळखी महिला एका गावात फिरू लागली. ती कोणासोबत काही बोलत नाही. तिची भाषा सुद्धा कोणालाही समजत नाही, तिची भाषा गोंडी हिंदी मिश्रीत अशा प्रकारची आहे. तिची मानसिक स्थिती बरोबर नसून ती तिचे नाव गाव देखील सांगत नाही. दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी दुपारी पोलीस पाटेील महिला ही गावात फिरत मारत असताना ती अनोळखी महिला गावातील एका ठिकाणी बसली होती. त्यामुळे पोलीस पाटील महिलेने तिच्याकडे जात तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. हाताने इशारे करत आपला कुणी विनयभंग केला, असे सांगण्याचा ती प्रयत्न करूत होती.
हातवारे करूनच पोलीस पाटील महिलेने तिला विचारण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, ती अंगाकडे इशारे करत तिच्याशी काहीतरी चुकीचे झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न करीत होती. त्या इशाऱ्यावरून कुणी अनोळखी व्यक्तीने तिचा विनयभंग केल्याचे लक्षात आले. पीडित महिला ही गतिमंद असृून, तिचे बोलणे कुणालाही समजत नाही, मात्र तिच्याशी दष्कृत्य झाले असावे, अशी खात्री पोलीस पाटील महिलेला झाली. त्यामुळे सामाजिक व नैतिक जबाबदारी म्हणून पोलीस पाटील महिलेने या प्रकरणी फिर्याद नोंदविली.
याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरूद्ध विनयभंग व शारीरिक अत्याचाराचा गुन्हा तात्काळ नोंदविला. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढील प्रक्रियेसाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली आहे.
प्रदीप चौगावकर,
ठाणेदार, वरूड