तिढा सुटला; तिवसा, बडनेरा, अचलपूर सेनेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 06:00 AM2019-10-02T06:00:00+5:302019-10-02T06:00:32+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरला उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, युतीमध्ये जागावाटपावर मतैक्य नसल्याने इच्छुकांची घालमेल सुरू होती. रोज नवनवी समीकरणे जिल्ह्यात चर्चिली जात होती. पितृपक्ष शनिवारी संपल्यानंतर रविवारपासून ‘मातोश्री’कडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

She escaped; Tivasa, Badnera, Achalpur Sena | तिढा सुटला; तिवसा, बडनेरा, अचलपूर सेनेला

तिढा सुटला; तिवसा, बडनेरा, अचलपूर सेनेला

Next
ठळक मुद्देमेळघाट, धामणगाव अनिर्णित : मोर्शी, अमरावती, दर्यापूर भाजपच्या वाट्याला

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तिवसा अन् बडनेरा मतदारसंघांसाठी अखेरच्या क्षणापर्यंत युतीमध्ये ताणले गेल्यानंतर मंगळवारी हा तिढा सुटला. या दोन मतदारसंघांसोबतच अचलपूरदेखील शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. विद्यमान आमदारांचे अमरावती, दर्यापूर व मोर्शी मतदारसंघ भाजपकडे कायम राहिल्याने वावड्यांना पूर्णविराम मिळाला आहे. धामणगाव रेल्वे व मेळघाट मतदारसंघाबाबतचा निर्णय वृत्त लिहिपर्यंत अनिर्णित होता
विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरला उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, युतीमध्ये जागावाटपावर मतैक्य नसल्याने इच्छुकांची घालमेल सुरू होती. रोज नवनवी समीकरणे जिल्ह्यात चर्चिली जात होती. पितृपक्ष शनिवारी संपल्यानंतर रविवारपासून ‘मातोश्री’कडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. युतीमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेल्या बडनेरा मतदारसंघांसाठी माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांना अधिकृत उमेदवारीचा ए व बी फॉर्म उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला. त्यामुळे सेनेच्या वाट्याला आणखी कोणते मतदारसंघ येतात, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. बडनेरा मतदारसंघाला पर्याय दिलेला तिवसा मतदारसंघदेखील सेनेच्या वाट्याला असल्याचे मंगळवारी दुपारी स्पष्ट झाले. येथे सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश वानखडे पहिल्यादांच निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. अचलपूर मतदारसंघासाठी नगराध्यक्ष सुनीता फिस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले. जिल्ह्यात हे तीनही मतदारसंघ यावेळी सेनेच्या वाट्याला गेले आहेत.
उर्वरित पाच मतदारसंघ आता भाजपकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तीनही विद्यमान आमदारांवर पक्षनेतृत्वाने विश्वास टाकला आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा होती ती दर्यापूर मतदारसंघाची. शिवसेनेकडूनही मतदारसंघासाठी प्रबळ दावा करण्यात आला. भाजपमध्येही यावेळी उमेदवारी बदलाबाबत उघड चर्चा होती. मात्र, रमेश बुंदिले यांनी तिकीेट खेचून आणले.
अमरावतीमध्ये स्थानिकांचा विरोध झुगारून पक्षनेतृत्वाने पुन्हा एकदा सुनील देशमुख यांना झुकते माप दिले आहे. शेवटच्या दोन महिन्यांत कृषिमंत्र्यांची धुरा असलेले अनिल बोंडे पुन्हा नवीन आव्हानांना सामोरे जाणार आहेत.

बंडोबा नाही
युतीमध्ये जाहीर सहा मतदारसंघांत इच्छुकांची दमदार नावे मुलाखतीमध्ये प्रामुख्याने समोर आली होती. मात्र, सोमवारी एक व मंगळवारी पाच मतदारसंघ आणि उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर बंडोबाबाबत दर्यापूर मतदारसंघ वगळता कुठेही वाच्यता झालेली नाही. कार्यकर्त्यांची थोडी प्रतिक्रिया दर्यापूर-अंजनगावात उमटली असली तरी हे बंड शमविले जाणारे असल्याचे भाजप नेते सांगताहेत.

भाजपचे रिपीट,
सेनेची कोरी पाटी

भाजपच्या वाट्याला आलेल्या विद्यमान तीनही मतदारसंघांतील उमेदवार सुनील देशमुख, अनिल बोंडे व रमेश बुंदिले हे आमदार आहेत. या उलट शिवसेनेचे जाहीर उमेदवार प्रीती बंड, सुनीता फिस्के व राजेश वानखडे यांना पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली आहे.

वंचित आघाडीचे सात उमेदवार रिंगणात
वंचित बहुजन आघाडीद्वारा सात मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करून निवडणुकीत रंगत आणली आहे. यामध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघाकरिता अलीम पटेल, बडनेरा प्रमोद इंगळे, अचलपूर नंदेश अंबाडकर, मोर्शी नंदकिशोर कुयटे, दर्यापूर रेखा वाकपांजर, धामणगाव रेल्वे नीलेश विश्वकर्मा व तिवसा मतदारसंघाकरिता दीपक सरदार हे उमेदवार आहेत.

कॉंग्रेसचे दोन उमेदवार जाहीर
आघाडीमध्ये काँग्रेसने विद्यमान आमदार व प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांना तिवसा, तर जेष्ठ आमदार वीरेंद्र जगताप यांना चांदूर रेल्वे मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसकडून अमरावती व मेळघाटची जोरकस मागणी करण्यात आलेली आहे. रिपाइंद्वारे दर्यापूरसोबत अचलपूर मतदारसंघासाठी दावा करण्यात आलेला आहे.

Web Title: She escaped; Tivasa, Badnera, Achalpur Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.