निराधारांच्या चेहऱ्यावर तिने फुलविले 'स्माइल'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:21 PM2018-03-07T23:21:03+5:302018-03-07T23:21:03+5:30
कुटुंबीयांपासून दुरावलेल्या मनोरुग्ण व निराधारांच्या चेहºयावर हास्य फुलविणारी उच्चशिक्षित निकिता गावंडे ही स्माइल फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायीे ठरले आहे.
वैभव बाबरेकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : कुटुंबीयांपासून दुरावलेल्या मनोरुग्ण व निराधारांच्या चेहºयावर हास्य फुलविणारी उच्चशिक्षित निकिता गावंडे ही स्माइल फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायीे ठरले आहे.
साधारण परिस्थितीतून जीवनयात्रा सुरू करणाºया निकिताचा जन्म २५ फेब्रुवारी १९९२ रोजी झाला. तिचे वडील मुकेश वाघ (साईनगर) आॅटो चालवून उदरनिर्वाह करतात. एका आॅटोचालकाची मुलगी जीवनात उत्तुंग भरारी घेईल, याची कल्पनाही निकिताच्या वडिलांना नव्हती. मात्र, शिक्षणात हुशार असलेल्या निकिताने बीएसडब्ल्यू व एसएसडब्ल्यूच्या पदवीसह फॅशन डिझाईनिंगचा कोर्स पूर्ण केला. समाजकार्याचे धडे प्रत्यक्षात उतरविण्याची संधी तिने घेतली. शहरात फिरणारे निराधार व मनोरुग्ण पाहून तिने आपल्या कार्याची, अर्थात या निराधारांच्या पुनर्वसनाची दिशा निश्चित केली. यादरम्यान तिचा परिचय मनोरुग्णांसाठी अहोरात्र झटणारे स्माइल फाऊडेंसनचे अध्यक्ष योगेश मालखरे यांच्याशी झाला. त्यांच्याकडून निकिताने प्रेरणा घेऊन तिने सत्कार्य सुरू केले. समाजाला काही देणे लागते, या दृष्टीने तिने बेवारस व निराधारांचे पुनर्वसनासाठी पाऊल उचलण्याचे ठरविले. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी निकिताचे बलवंत गावंडे यांच्याशी लग्न झाले. त्यांनीही निकिताच्या समाजकार्याला प्रोत्साहनच दिले. त्यामुळे ती पूर्ण जोमाने निराधार व मनोरुग्णांच्या पुनर्वसनाच्या काम करू लागली. अमरावती शहरात वणवण भटकणाºया अनेकांचे निकिता या आधारवड बनल्या आहेत.
२८ बेघर मनोरुग्णांना आधार
अमरावती जिल्ह्यात फिरून निराधार व मनोरुग्णांचा निकिताने शोध घेतला. आतापर्यंत २८ जणांच्या पुनर्वसनासाठी तिने प्रयत्न केले. आठ जणांना कुटुंबीयांपर्यंत पोहचविले. काहींना वृद्धाश्रमात, काहींना नागपूर येथील माणुसकी निवासात, काही जणांना मनोरुग्णालयात दाखल केले.
निकिता विदर्भाची वाघीण
निकिता गावंडेच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे तिने सहकाºयांची मने जिंकली आहेत. वक्तृत्व कलेची उपासक निकिता बेवारस स्थितीतील नागरिकांना न्याय मिळून देण्यासाठी झटते आहे. तिचे संवगडी निकिताला वाघिणीची उपमा देतात.