जाती-धर्मापल्याड जाऊन ‘तिने’ निभावला शेजारधर्म !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:02 AM2017-07-25T00:02:23+5:302017-07-25T00:02:23+5:30
जाती-धर्मासाठी एकमेकांचे प्राण घेण्यासाठी, रक्तपातासाठी एका पायावर तयार असलेला एक समूह ....
२० वर्षांचा सहवास : वहिदाच्या सुश्रुषेत विमलाने सोडले प्राण
वैभव बाबरेकर । लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जाती-धर्मासाठी एकमेकांचे प्राण घेण्यासाठी, रक्तपातासाठी एका पायावर तयार असलेला एक समूह आणि नेत्रहीन हिंदू दाम्पत्याचा केवळ शेजारधर्म, माणुसकी म्हणून अनेक वर्षे सांभाळ करणारी वहिदा बानो. एकाच समाजात आढळणारी ही दोेन टोेके. पण, जेथे धर्मवेड्यांचा उत्पात चालतो, त्याच समाजात जाती-धर्माच्या भावनेचा कुठलाही स्पर्श न होऊ देता एकमेकांना जिवापाड जपणाऱ्या ‘वहिदा-विमला’देखील सापडतात. एखादी वहिदा एखाद्या अंध विमलाचा मरेपर्यंत सांभाळ करते आणि पुन्हा एकदा निकोप समाज निर्मितीच्या आशा पल्लवीत होतात.
‘ते’ दाम्पत्य नेत्रहीन. फ्रेजरपुरा पोेलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राहुलनगरात मागील २० वर्षांपासून त्यांचे वास्तव्य आहे. विमलाबाई व मुरारी अवचरकर असे या दाम्पत्याचे नाव. घरात अठराविश्वे दारिद्रय. दृष्टीहीन असल्याने उत्पन्नाचे साधनही नाही. लोकांनीच सामूहिक वर्गणी करून बांधून दिलेल्या झोपडीवजा घरात त्यांचे वास्तव्य. या दाम्पत्याला एक मुलगी. तीदेखील विवाहित. सध्या तिचे वास्तव्य गुजरातेत आहे. त्यामुळे अंध विमलाबाई व मुरारी यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला. पण, शेजारीच राहणारी मुस्लिम महिला वहिदा बानो पुढे आली. जाती-धर्माच्या पल्याड जाऊन तिने या दाम्पत्याची काळजी घेणे सुरू केले.
विमलाबाई आणि मुरारी यांना जेवणाचा डबा पोहोचविणे, त्यांची इतर देखभालही तीच करीत असे. कित्येक वर्षे हा क्रम चालला. पण, काळच तो. कुणासाठी थांबणार कसा? दोन वर्षांपूर्वी आजाराने ग्रासलेल्या मुरारी अवचरकर यांचे निधन झाले आणि विमलाबाई एकट्या पडल्या. पण, वहिदा बानो यांनी त्यांची साथ सोडली नाही. त्या अधिक आपुलकीने विमलाबार्इंची काळजी घेऊ लागल्या. जाती-धर्म विलग असले तरी त्यांची सलगी सख्ख्या बहिणींसारखीच होती. वहिदा बानो यांनी त्यांचा हा भगिनीधर्म अखेरपर्यंत निभावला. अखेर त्यांच्याच सुश्रुशेत आणि त्यांच्याच आश्रयाने विमलाबार्इंनी काल रविवारी अखेरचा श्वास घेतला. रविवारी दुपारी आजारी असलेल्या विमलाबाई घरात बेशुद्ध पडल्या. ही बाब लक्षात येताच वहिदा बानो यांनी त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांची गुजरातेतील कन्या पोहोचू शकली नाही. अखेर शेजाऱ्यांनीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत.
धर्मांधांनी घ्यावा आदर्श
जाती-धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून स्वत:ची पोळी भाजणाऱ्या धर्मांधांनी या घटनेचा आदर्श घेण्याची आज नितांत गरज आहे. तळागाळातील, आर्थिक विपन्नावस्थेत जीवन जगणाऱ्यांना जाती-धर्माच्या या भिंतींशी काही देणेघेणे नाही. असे नसते तर अशा ‘वहिदा-विमला’ पाहायला मिळाल्या नसत्या.