वनविभागाच्या कस्टडीतून तिने आपल्या पिलाला घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:13 AM2021-05-09T04:13:07+5:302021-05-09T04:13:07+5:30
परतवाडा : वनविभागाच्या कस्टडीतून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत एका माकडीणने आपल्या पिलाला ताब्यात घेतले. ही घटना ४ मे रोजी ...
परतवाडा : वनविभागाच्या कस्टडीतून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत एका माकडीणने आपल्या पिलाला ताब्यात घेतले. ही घटना ४ मे रोजी दुपारी अमरावती - परतवाडा मार्गावरील भूगावलगत वन कर्मचाऱ्यांसह यात्रेकरूंना अनुभवता आली.
प्राप्त माहितीनुसार, भूगाव शिवारात माकडाच्या कळपातून एक अवघ्या पाच-सहा दिवसांचे पिलू भटकल्याचे गावकऱ्यांना आढळून आले. याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. माहितीच्या आधारे वनरक्षक अहिरराव व त्यांचे सहकारी लागलीच घटनास्थळावर दाखल झालेत. रखरखत्या उन्हात भटकलेल्या त्या पिलाला त्यांनी मायेने जवळ घेतले. आजूबाजूला त्या माकडांच्या कळपाचा त्यांनी शोध घेतला. पण तो कळप किंवा त्यातील माकडे त्यांना आढळून आली नाहीत.
यात ते त्या पिलाला सोबत घेऊन परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे येण्यास निघाले. दरम्यान त्यांना पुढे काही अंतरावर, याच रोडवरील एका शेतात माकडांचा कळप दिसला. या कळपात या पिलाची आई असल्यास ती त्याला घेऊन जाईल, या आशेने त्यांनी आपले वाहन थांबविले. वाहनाच्या काचेसमोरील टपावर त्या पिलाला ठेवले. पिलू टपावर खेळत असताना त्याच्या आईचे लक्ष त्याचेकडे गेले. लागलीच ती पिलाकडे धावत आली. अन्य माकडेही तिच्यापाठोपाठ तेथे पोहोचले. आईला पिलाची आणि पिलाला आईची ओळख पटताच ते दोघेही एकमेकांजवळ पोहोचलेत. त्याने आईच्या पोटाला घट्ट मिठी मारली आणि आई (माकडीण) त्या पिलाला घेऊन पुढे कळपाच्या दिशेने निघून गेली.
सहसा मानवी हस्तक्षेपानंतर वन्यजीव आपल्या अपत्यांना सहजासहजी स्वीकारत नाही. पण, या घटनेत त्या पिलाला त्याच्या आईने स्वीकारले. त्यामुळे माकडाच्या पिलाला त्याची आई मिळवून देता आली आणि तिनेही त्याला ओळखून त्याचा स्वीकार केला. याचा आनंद संबंधित वनकर्मचाऱ्यांना झाला. त्यांनी घटनास्थळाहूनच ही माहिती वनाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून सांगितली. तेव्हा या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना मिळालेले समाधान शब्दापलीकडचे ठरले.