पीपीई किट घालून तिने घेतले पतीचे शेवटचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:09 AM2021-05-03T04:09:10+5:302021-05-03T04:09:10+5:30
अमरावती : एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करणाऱ्या चाळीसगावच्या एका २८ वर्षीय तरुणाचा कोविड रूग्णालयात उपचारा दरम्यान २९ एप्रिल ...
अमरावती : एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करणाऱ्या चाळीसगावच्या एका २८ वर्षीय तरुणाचा कोविड रूग्णालयात उपचारा दरम्यान २९ एप्रिल रोजी रात्री मृत्यू झाला. सकाळी जिवंत असलेल्या पतीचा रात्री अचानक मृत्यू झाल्याने महिलेने मृतदेह खोलून दाखवावा याकरिता कोविड रुग्णालयात गोंधळ घातला. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी महिलाने पीपीई किट घालून पतीचे शेवटचे दर्शन घेतले व टोह फोडला. हा दु:खाचा क्षण बघून पोलीस व डॉक्टरही गहिवरले.
पोलीससुत्रानुसार, उत्कर्ष फायन्नस कंपनीत जॉब करणाऱ्या चाळीसगाव येथील एका २८ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना २७ एप्रिल रोजी उपचाराकरिता येथील सुपरस्पेशालिटी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. २७ ते २९ तारखेच्या दुपारपर्यंत तो २५ वर्षीय पत्नीशी फोनवर सतत बोलत होता. व्हॅटसॲपवर त्यांनी चॅटींग सुद्धा केले. मात्र, २९ ला दुपारी त्यांचा फोन बंद पडला व रात्री ८ वाजताच्या सुमारास पतीचे निधन झाल्याची माहिती पत्नीला व नातेवाईकांना डॉक्टरांनी दिली. दुपारपर्यंत चांगले बोलत असलेल्या पतीचे अचानक निधन झाल्याची वार्ता ऐकून पत्नीला विश्वास बसला नाही. तिने कोविड रुग्णालयात धाव घेऊन पतीला पीपीई किट खोलून बघू द्या, असे डॉक्टरांना सांगितले. मात्र नियमानुसार मृतदेह पीपीई किटच्या बाहेर काढता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर महिलेने चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे तातडीने गाडगेनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. महिलेची पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीही पतीला बघितल्याशिवाय आपण येथून जाणार नाही व मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका पत्नीने घेतली. अखेर रात्रभर मृतदेह कोविड रुग्णालयातच ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी ३० एप्रिल रोजी महिलेने व तिच्या चार नातेवाईकांना कोविड रुग्णालयाच्यावतीने पीपीई किट देण्यात आल्या. त्यानंतर पत्नीने पतीचा चेहरा बघितला व शेवटचे दर्शन घेताच तिने टोह फोडला. यावेळी उपस्थित डॉक्टर व पोलीसही भावूक झाले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आला. कोविडच्या नियमावलीनुसार मृतदेहावर अमरावतीतच अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोट
नियमानुसार मृतदेह डॉक्टरांनी पीपीई किटच्या बाहेर काढण्यास नकार दिला. मात्र पतीचा शेवटचा चेहरा दाखवा असा हट्ट महिलेचा होता. त्याकरिता तिने गोंधळसुद्धा घातला. प्रसंग भावनिक होता. दुसऱ्या दिवशी कोविड प्रशासनच्यावतीने त्यांना पीपीई किट घालून त्यांनी पतीचे शेवटचे दर्शन घेतले.
- विजय यादव, पोलीस निरीक्षक गाडगेनगर