धुक्याची चादर... पाऊस अन् गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 05:00 AM2021-12-29T05:00:00+5:302021-12-29T05:00:57+5:30
जिल्ह्यात सकाळपासून धुके अन् ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला यामध्ये अचलपूर्- परतवाडा व मोर्शी तालुक्यात अंबाडा येथे हरभऱ्याएवढी गार पडली. यामुळे संत्र्याचे फळाला मार लागल्याने फळगळ होण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर धुके, हलका पाऊस व काही ठिकाणी गारपीट झाली. सायंकाळनंतर पुन्हा रात्री पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण तुरीसह, हरभऱ्याला बाधक आहे याशिवाय गारपीटमुळे भाजीपाला व फळपिकांचे नुकसान होत आहे. ३० डिसेंबरपर्यत ही स्थिती कायम राहणार आहे.
जिल्ह्यात सकाळपासून धुके अन् ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला यामध्ये अचलपूर्- परतवाडा व मोर्शी तालुक्यात अंबाडा येथे हरभऱ्याएवढी गार पडली. यामुळे संत्र्याचे फळाला मार लागल्याने फळगळ होण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे.
धामणगाव तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातवरण होते. अंजनसिंगी येथे दुपारनंतर विजेच्या कडकडाटात हलक्या पावसाची नोंद झाली. बडनेरात दुपारनंतर रिमझिम पाऊस पडला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. मोर्शी तालुक्यात हिवरखेडलाही पाऊस झाला. जरुड, आसेगाव पूर्णा येथे सकाळपासून ढगाळ वातावरण होते.
चिखलदरा, धारणी तालुक्यासह मुक्तागिरी व बहिरम येथेही पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्रच धुके व ढगाळ वातावरण असल्याने तूर व हरभरा पिकावर शेंगा व घाटे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
तळेगाव दशासरला वीज पडून मृत्यू
धामणगाव रेल्वे तालुक्यात मंगळवारी वीज पडून ४२ वर्षीय गजानन बापूराव मेंढे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. निमगव्हान मार्गावरील शेतातून ते दुचाकीने शेतातून घरी येत असतांना वीजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. याचवेली गुटकी नाल्याजवळ अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.
नांदगाव तालुक्यात पावसासह गारपीट
तालुक्यात मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पहूर, कणी मिर्झापूर परिसरात तुरीच्या आकाराची गारपीट झाल्याने कांदा, फुलोरा अवस्थेत असलेल्या हरभरा पिकाचे नुकसान झाल्याचे पहूर येथील शेतकरी पद्माकर भेंडे यांनी सांगितले. शिवणी रसुलापूर, शिंगणापूर, चिखली परिसरात विजेच्या कडकडाटासह बोराच्या आकाराची गारपीट झाल्याचे शिवणी येथील चंद्रशेखर वैद्य महाराज यांनी सांगितले.
गाडेगाव-टेमणी शिवारात पाऊस, गार
वरूड तालुक्यातील गाडेगाव-टेमणी शिवारात सकाळी ११ च्या सुमारास काळेकुट्ट ढग दाटून पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू असतानाच हलकीशी गार पडली. पावसाने रस्ते ओलेचिम्ब झाले आहेत. रब्बी हंगामातील पिकांना या पावसाचा फायदा होत असला तरी वेचणीस आलेला कापूस पाण्यात भिजला.
सकाळी नऊपर्यत वाहनांचे लाईट सुरु
शहरात पहाटेपासून धुके नागरिकांनी अनुभवले. सकाळी ९ -१० पर्यत रस्त्यावरील वाहनांचे दिवे सुरू होते. एवढे दाट धुळे असण्याची ही यंदाची पहिलीच वेळ आहे. वातावरणात गारवाही असल्याने नागरिक उबदार कपड्यांनीच बाहेर पडले. दुपारी चारच्या सुमारास १५ मिनिटांपर्यत हलक्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली तरी बच्चेकंपनीने मात्र पावसाचा आनंद घेतला
चिखलदऱ्यात क्षणातच पसरतात पांढरे शुभ्र धुके
विदर्भाची काश्मीर म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्यात वातावरणात क्षणात बदल होतात. पावसाच्या सरी आणि पांढरे शुभ्र धुके पसरते. येणाऱ्या पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरते. विविध पॉईंटवरील रस्ते दाट धुक्यात हरवल्याने वाहनांच्या दिव्यांच्या प्रकाशात प्रवास करताना वेगळा अनुभव पर्यटकांना येथे येत आहे. थर्टी फर्स्टसाठी योग्य माहोल तयार झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
कुठे मुसळधार कुठे रिमझिम,
- चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा, आसेगाव पूर्णा घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, देऊरवाडा, करजगाव, गोविंदपूर, कुऱ्हा देशमुख परिसरात तुफान पाऊस व गारपीट झाली. यामुळे संत्रा, कापूस, मिरची, हरभरा, गहू उत्पादकांना नुकसानाची चिंता भेडसावत आहे. अंजनगाव सुर्जी येथे सायंकाळी ५ वाजता गडगडाटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पुसला परिसरात कमी जाडीची गार कोसळली.
- तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. जरूडमध्ये ढगाळ वातावणामुळे वातावरणातील आर्द्रता वाढली.
- भातकुली शहरासह तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर, टाकरखेडा संभू येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
- चांदूर रेल्वे येथे पावसाच्या सरी बरसल्या. पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांनी शेतातून काढता पाय घेतला. तूर सोंगण्याच्या कामवरील मजुरांना तसेच शेतकऱ्यांना मोदी हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या.
नुकसान झाल्यास ७२ तासात विमा कंपनीला कळवा
नैसर्गिक आपत्ती या सदरात गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे ७२ तासांच्या आत विमा कंपनी किंवा प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायाच्या ठिकाणी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. या नुकसानीची विमा कंपनीच्या समितीद्वारा पाहणी करण्यात येणार आहे. कापणीपश्चात नुकसान झाल्यास कंपनीला तसे कळवावे लागेल.