शीतलचा 'प्री-प्लॅन मर्डर'च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:57 PM2018-03-24T23:57:20+5:302018-03-24T23:57:20+5:30

आक्रमण संघटनेच्या संघटक शीतल पाटील यांची अत्यंत सुनियोजित पद्धतीने हत्या करण्यात आल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस यंत्रणा पोहोचली आहे.

Sheetal's 'Pre-Plan Murder' | शीतलचा 'प्री-प्लॅन मर्डर'च

शीतलचा 'प्री-प्लॅन मर्डर'च

Next
ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचा दावा : आरोपींनी मोबाईल नेऊन ठेवले होते घरी

आॅनलाईन लोकमत
अमरावती : आक्रमण संघटनेच्या संघटक शीतल पाटील यांची अत्यंत सुनियोजित पद्धतीने हत्या करण्यात आल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस यंत्रणा पोहोचली आहे. आरोपी सुनील गजभियेला अटक केल्यानंतर या प्रकरणातील गूढ हळुहळु उलगडू लागले असून, शीतलची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आत्महत्येचा बनाव रचण्यात आला, असे निरीक्षण तपासादरम्यान पोलिसांनी नोंदविले आहे.
सुनील गजभिये १३ मार्च रोजी शीतलला घेऊन वलगाव रोडवर पोहोचला. काही वेळात रहमानही तेथे दुचाकीने पोहोचला. रहमानने गजभिये व स्वत:चा मोबाइल आपआपल्या घरी नेऊन ठेवल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. मोबाइल घरी नेऊन ठेवणे, १३ मार्चनंतर शहराबाहेर जाणे, दोघांचेही मोबाइल बंद असणे या सर्व बाबी 'प्री प्लॅन' असल्याचा दावा पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केला आहे. रहमान खान हा पोलिसांच्या तावडीत न आल्याने हत्या नेमकी कशी झाली, याचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही. चांदुरबाजार रोडवर असताना अर्धा तासाकरिता गजभिये त्याच्या गोविंदप्रभू नावाच्या मंगल कार्यालयात गेला होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, गाडगेनगर पोलिसांनी शहानिशा केली असता, गजभिये तेथे गेलाच नसल्याचे पुढे आले आहे. तथापि, गजभिये कुठे व कशासाठी गेला, हे गुलदस्त्यात आहे.
बँक खाते गोठविणार
गडचिरोली येथील शिवदास गोंडाणे याने आरोपी गजभियेच्या पत्नीच्या बँक खात्यात लाखो रुपयांची रक्कम जमा केली. याबाबत पोलिसांनी गजभिये दाम्पत्याच्या खात्याची माहिती मागविली. बँक खात्यातील व्यवहार सद्यस्थितीत बंद करण्यासाठी पोलिसांनी बँकेला पत्र पाठविले आहे.
गजभियेचा मोबाईल, कपडे जप्त
आरोपी सुनील गजभिये याने मोबाइल घरी ठेवला आणि त्यानंतर बाहेरगावी गेला होता. त्यानंतर थेट न्यायालयात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी गजभियेच्या पत्नीला मोबाइल जप्तीसाठी मागितला होता. मात्र, तो घरी नसल्याचे सांगितले गेले. गजभियेच्या मोबाइल क्रमांकावर कॉल केल्यानंतर रिंग घरातच वाजली. पोलिसांनी आलमारीतील एका ड्राव्हरमधून गजभियेचा मोबाइल व त्याचे कपडे जप्त केले.
शिवदास गोंडाणेला २८ पर्यंत पीसीआर
सुनील गजभिये हा १७ मार्च रोजी गडचिरोली येथील शिवदास गोंडाणेसोबत होता. त्याने गजभियेला आश्रय दिला. सोबतच गोंडाणे याने गजभियेच्या पत्नीच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. त्यामुळे गजभिये व गोंडाणे यांच्या संबंधातील तथ्य पोलीस जाणून घेत आहेत. गोंडाणेला गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. त्याला २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली.

दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. एकमेकांविरुद्ध घृणा वाढली होती. त्यामुळे सुनियोजित पद्धतीने ही हत्या करण्यात आली. मोबाइल लोकेशन मिळू नये, यासाठी आरोपींनी ते घरी नेऊन ठेवले.
-दत्तात्रय मंडलिक, पोलीस निरीक्षक.

Web Title: Sheetal's 'Pre-Plan Murder'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.