शेख जफरचा सुगावा पोलिसांना लागेना
By admin | Published: November 30, 2014 10:56 PM2014-11-30T22:56:23+5:302014-11-30T22:56:23+5:30
चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार उपमहापौर शेख जफर हा सात दिवसांपासून पसार आहे. मात्र त्याचा सुगावा अद्यापपर्यंत पोलिसांना लागलेला नाही. बडनेरा फार्म हाऊसवरुन जफरने
गोळीबार प्रकरण : कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
अमरावती : चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार उपमहापौर शेख जफर हा सात दिवसांपासून पसार आहे. मात्र त्याचा सुगावा अद्यापपर्यंत पोलिसांना लागलेला नाही. बडनेरा फार्म हाऊसवरुन जफरने पलायन केले. मात्र तो कुठे व कसा पळून गेला याचा थांगपत्तासुध्दा पोलिसांना लागलेला नाही.
२३ नोव्हेंबर रोजी जुन्या वैमनस्यातून भरदिवसा चांदणी चौकात दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गटातील सदस्य परस्परांविरुध्द तक्रार करण्यासाठी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांच्यात ठाण्यासमोरच वाद झाला. पोलिसांनी चौघांना पकडले. ठाण्यासमोर त्यांनी वाद घातल्याने ते पोलिसांच्या तावडीत सापडले. सध्या या चारही आरोपींची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र सात दिवस पोलीस कोठडी घेऊनही आरोपींकडून अद्यापपर्यंत कोणतीही कबुली पोलीस मिळवू शकले नाहीत. दुसरीकडे गोळीबार प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले असताना शेख जफरच्या मदतीसाठी तब्बल बारा नगरसेवक सरसावले. ते आपल्या सहीनीशीचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यासाठी गेले होते.
कित्येकदा दोष नसताना केवळ तक्रारीत नाव आहे म्हणून सामान्य व्यक्तीला पोलीस लगेच बेड्या ठोकतात. परंतु शेख जफरसारखा कुख्यात गुंडाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही. सात दिवसांपासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी होत असल्याने या संपूर्ण घटनाक्रमात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह लावले जात आहे. शेख जफर प्रकरणासंदर्भात माध्यमांचे प्रतिनिधी पोलिसांकडे विचारणा करण्यास गेल्यानंतर त्यांच्याकडून माहिती दडवून ठेवली जात आहे. वृत्तपत्रातील माहितीवरुन जफर आपले स्थान बदलवीत असल्याचा ठपका पोलिसांकडून ठेवला जात आहे. दुसरीकडे त्याचा कसून शोध घेतला जात आहे, असे सांगून पोलीस वेळ काढू धोरण अवलंबत आहेत. त्यामुळेच पोलिसांच्या या एकूणच कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.