आश्रमाने का लपविले सत्य ?
By admin | Published: August 26, 2016 12:14 AM2016-08-26T00:14:05+5:302016-08-26T00:14:05+5:30
प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या आश्रम हद्दीतील वसतिगृहात वास्तव्याला असलेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या नरबळीसाठीच्या
संशय बळावणारी चुप्पी : व्यवस्थापन, शंकर महाराजांनी का दिली नाही पोलीस तक्रार ?
अमरावती : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या आश्रम हद्दीतील वसतिगृहात वास्तव्याला असलेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या नरबळीसाठीच्या हल्ल्यानंतर आश्रमाने प्रशासन आणि पालकांना खोटी माहिती का दिली? आश्रम पदाधिकाऱ्यांचा त्यामागील उद्देश काय, हे रहस्य उलगडणे महत्त्वपूर्ण आहे.
प्रथमेशवर जीवघेणा हल्ला झाला. आश्रमातच त्याचा गळा कापला गेला. घडलेला प्रकार कोणीतरी मुद्दामच केलेला असल्याची पूर्ण जाणीव असतानाही आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिशाभूल करणारी माहिती दिली. प्रथमेशला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले त्यावेळी प्रथमेशच्या गळ्यावर असलेले वार हे अपघाताच्या जखमा असल्याचा बनाव आश्रम पदाधिकाऱ्यांनी केला. येथे दोन मुद्दे उपस्थित होतात- आश्रमाला घटनेबाबत कल्पना असतानाही ती लपविण्याचा उद्देश काय? आश्रमाला घटनेबाबत कल्पना नसल्याचे, गळ्यावर दिसणारी जखम कशाची आहे याबाबतची नेमकी माहिती नसल्याचे गृहीत धरले तर - जखम कशाने झाली याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत, अशी माहिती आश्रमाच्यावतीने वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला देता आली असती. त्याही पुढे जाऊन जखमा कशामुळे झाल्यात हे समजवून घेऊन प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्नदेखील आश्रमाला करता आला असता. डॉक्टरांच्या ‘त्या’ निरीक्षणांच्या उल्लेखासह पोलीस तक्रारही नोंदविता आली असती. आश्रमाने असे काहीच केले नाही.
३० जुलैच्या मध्यरात्रीनंतर अजय वणवे या पाचवीतील मुलाचा वसतिगृहात चेहरा आणि डोके ठेचण्यात आले. त्याला पहाटे इलाजासाठी हलविले गेले. अजयसोबत घडलेली घटना वसतिगृहात घडली असल्याचे आश्रम पदाधिकाऱ्यांना पूर्णपणे ठाऊक होते. अजयला त्यांनी वसतिगृहातच रक्तबंबाळ आणि बेशुद्धावस्थेत बघितले होते. तथापि घटनेची सत्यस्थिती लपवून अजयच्या आईला आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती स्वत:हून दिली. अजय स्वच्छतागृहात पडल्याचे त्यांनी किरण वणवे यांना सांगितले. नवऱ्यापासून विभक्त झाल्यावर ज्या माऊलीने काळजाचा तुकडा अतिव विश्वासाने शंकर महाराज आश्रम ट्रस्टद्वारा संचालित शाळा-वसतिगृहात ठेवला, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न तर होतोच; शिवाय त्या माऊलीशी बोलताना आश्रमातीलच लोक धादांत खोटे बोलतात. लोककल्याणासाठी, विश्वशांतीसाठी कार्य करणाऱ्या कुण्याही धर्म संस्थेला शोभावे, असे हे वर्तन आणि कृत्य नाहीच. शासकीय वसतिगृहाच्या अखत्यारित कुण्या विद्यार्थ्यावर असा जीवघेणा हल्ला झाल्यानंतर ती माहिती शासनापासून, प्रशासनापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवणे हा गंभीर गुन्हा ठरतो. आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी हा गुन्हा केला आहे.
द्या ना लोकांना माहिती !
पिंपळखुटा आश्रमात दोन विद्यार्थ्यांवर नरबळीचा प्रयत्न झाला. या आश्रमात लोककल्याणाची कामे चालतात, असा लोकांचा दृष्टिकोन आहे. संगणक युगात नरबळीच्या प्रयत्नाच्या घटना आश्रमात घडतात. तेथे सुशिक्षित लोकांचा भक्त, पदाधिकारी या नात्याने वावर असतो. स्वत: शंकर महाराज यांचेही तेथे वास्तव्य असते. भयंकर घटनेनंतर आश्रमाची भूमिका लोकांसमोर मांडण्यात का आली नाही ? काय घडले, हे जाणून घेणे, लोकांचा अधिकार आहे. पत्रपरिषद घेऊन आश्रमाने सत्य का सांगितले नाही ? शंकर महाराज हे आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांची भूमिका का जाहीर करण्यात आली नाही ? मीडियाला आश्रमाची बाजू कळविण्यासाठी प्रवक्त्याची नियुक्ती करणे हे आश्रमाचे कर्तव्य ठरते. परंतु त्याऐवजी मीडियाविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अशा संशयास्पद गोपनियतेचा अट्टाहास का ?
बोलू लागले लोक
आश्रमात घडलेल्या नरबळी प्रकरणाबाबत लोक उत्स्फूर्तपणे व्यक्त होऊ लागले आहेत. नाना प्रतिक्रिया पत्रांद्वारे प्राप्त झाल्या आहेत. आश्रमाबाबतचे अनेक आश्चर्यकारक अनुभव लोकांनी ‘लोकमत’ला लिहून पाठविले आहेत. तुम्हीही लिहू शकता. पत्ता आहे : ‘लोकमत’, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, शिवाजीनगर,
अमरावती - ४४४६०३