अयोध्येत राम मंदिराची उभारणी होईपर्यंत 'ते' कापणार नाहीत शेंडी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 11:25 AM2020-08-05T11:25:26+5:302020-08-05T14:55:40+5:30
अयोध्येत राम मंदिराची उभारणी होईपर्यंत डोक्यावरील शिखा (शेंडी) कापणार नाही, असा संकल्प ब्राह्मणवाडा थडीलगतच्या करजगाव येथील कारसेवक विजय वडनेरकर यांनी केला आहे.
अमरावती: अयोध्येत राम मंदिराची उभारणी होईपर्यंत डोक्यावरील शिखा (शेंडी) कापणार नाही, असा संकल्प ब्राह्मणवाडा थडीलगतच्या करजगाव येथील कारसेवक विजय वडनेरकर यांनी केला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिराचं भूजिपूजन केलं आहे. त्यामुळे वडनेकर यांचा संकल्प आकारास येत आहे. मात्र, पुढील दीड वर्षे त्यांना शिखा डोक्यावर कायम ठेवावी लागणार आहे.
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री विजय वडनेरकर (५०) यांनी वयाच्या विशीत १९९० च्या कारसेवेत सहभाग घेतला. यादरम्यान कारसेवकांचे बलिदान जवळून पाहिले. त्याचवेळी त्यांनी राम मंदिर झाल्याशिवाय शिखा कापणार नाही, असा संकल्प केला होता. ३० वर्षांपासून ते राम मंदिर आंदोलनाशी जुळले आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. त्यानिमित्त आतापर्यंत चार फूट झालेली शिखा कापण्याचे नियोजन वडनेरकर यांनी केले होते. मात्र, अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे पीठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी थांबविले. दीड वर्षानंतर अयोध्या येथे होणाऱ्या महायज्ञादरम्यान शिखा कापण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. त्यांच्या आज्ञेनुसार आता दीड वर्षानंतरच शिखा कापू, असे वडनेरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.