कचरामुक्ती अभियानात शेंदूरजनाघाट ठरले तारांकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 05:00 AM2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:01:19+5:30
शेंदूरजनाघाटसह विदर्भातील नऊ शहरांचा तारांकित शहरांमध्ये समावेश आहे. केंद्रीय मंत्रालयाने तीन वर्षांपासून पाच स्टार व तीन स्टार नामांकन केले होते. सिंगल स्टार या वर्षापासून प्रमाणपात्र असून, जागतिक दर्जाचा स्टार नामांकनावर आधारित विश्वास आणि भाराचा मानबिंदू असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यासाठी देशातील १४३५ शहरांनी आवेदन केले होते. त्यात ६९८ शहरे बाद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंदूरजनाघाट : केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाच्यावतीने कचरामुक्त शहराचे स्टार रेटिंग घोषित करण्यात आले. राज्यातील ७६ शहरांपैकी वरूड तालुक्यातील शेंदूरजनाघाट या शहराला एकल तारांकन मिळाले आहे.
शेंदूरजनाघाटसह विदर्भातील नऊ शहरांचा तारांकित शहरांमध्ये समावेश आहे. केंद्रीय मंत्रालयाने तीन वर्षांपासून पाच स्टार व तीन स्टार नामांकन केले होते. सिंगल स्टार या वर्षापासून प्रमाणपात्र असून, जागतिक दर्जाचा स्टार नामांकनावर आधारित विश्वास आणि भाराचा मानबिंदू असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यासाठी देशातील १४३५ शहरांनी आवेदन केले होते. त्यात ६९८ शहरे बाद झाली. उर्वरित शहरांमधील नागरिकांची मते घेण्यात आली. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील पाहणी केल्यानंतर निकाल दिला.
महाराष्ट्रातील ७६ स्वच्छ शहरांपैकी अमरावती विभागातील शेंदूरजनाघाट व अंजनगाव सुर्जी या दोन नगर परिषदांच्या शहरांना स्वच्छ शहर घोषित करण्यात आले आणि तारांकित करण्यात आले. शेंदूरजनाघाट हे शहर यापूर्वी स्वच्छता अभियानात देशभरात पश्चिम विभागातील नागरिकांचा प्रतिसाद पुरस्काराने नावारूपाला आलेला आहे. यात या मिळालेल्या मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे. त्याबद्दल पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे व सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. शहरात एकही व्यक्ती कोरोनाबाधित होणार नाही याबाबत सर्वांनी दक्षता घेऊन सहकार्य करावे, असे नगर परिषदने आवाहन केले आहे.