शेंदूरजनाघाटला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:15 PM2017-10-22T23:15:03+5:302017-10-22T23:15:14+5:30
स्थानिक शेंदूरजनाघाट येथे अचानक आलेल्या वादळाने झाड कोसळून दोन मेंढ्या दगावल्या, तर एक मेंढी जखमी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंदूरजनाघाट : स्थानिक शेंदूरजनाघाट येथे अचानक आलेल्या वादळाने झाड कोसळून दोन मेंढ्या दगावल्या, तर एक मेंढी जखमी झाली. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजतादरम्यान जीवना व देवना नदीच्या संगमावर स्मशानभूमी परिसरात घडली.
जीवना-देवना नदीच्या संगमावरून मेंढ्यांचा कळप आपल्या ठिकाणावर परत येत असताना वादळाच्या तडाख्यात सापडला. तेथून क्षणात चारचाकी वाहन पुढे गेले आणि झाड कोसळले. सुदैवाने मनुष्यहानी टळली. तेव्हा नाना मदने यांचा मेंढराचा कळप त्यात सापडला व त्यातील दोन मेंढ्या झाडाखाली दबून मृत पावल्या. चक्रीवादळाने गावात टिनाचे शेड, तर कुठे गुरांचे गोठे कोसळले. त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. माहिती मिळताच शेंदूरजनाघाटचे बीट जमादार जैस्वाल यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी नगर परिषद अध्यक्ष रूपेश मांडवे, नगरसेवक सुभाष गोरडे, जयप्रकाश भोंडेकर, राकेश दवंडे, जीवन वंजारी, भुपेंद्र कुवारे, नप कर्मचारी दीपक सोनेकर, रवी सोनेकर, आनंद शेंद्रे, विद्युत मंडळाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.