मेंढपाळ-वनकर्मचाऱ्यांत संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:18 PM2018-07-24T22:18:55+5:302018-07-24T22:19:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा अंतर्गत येणाऱ्या अंजनगाव वनपरिक्षेत्रातील चिंचोना बीटमध्ये अनेक दिवसांपासून बस्तान मांडलेल्या अतिक्रमणधारक १९ मेंढपाळांवर वनविभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दुपारी कारवाई केली. यात मेंढपाळ आणि वनविभागात संघर्ष उडाला. मात्र, पोलीस व वनकर्मचाऱ्यांचा ताफा प्रचंड होता. जंगलात घुसखोरी व अतिक्रमण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा अंतर्गत अंजनगाव वनपरिक्षेत्रातील चिंचोना बीट क्रमांक ८० व ८१ मध्ये मोठ्या प्रमाणात मेंढपाळांनी अतिक्रमण केल्याची तक्रार वनविभागाकडे करण्यात आली होती. त्यावरून मंगळवारी वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस कर्मचारी आदींनी मेंढपाळांनी अतिक्रमण केलेल्या जंगलातील जागेवरील तारेचे कुंपण हटविले. सदर कारवाई करीत असताना मेंढपाळांनी विरोध केला. मात्र, वन विभाग आणि पोलिसांच्या प्रचंड ताफ्याने विरोध मोडून एकूण १९ मेंढपाळांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम (२६) (ड) (एच) (१-ए) (ए) अन्वये गंभीर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईमध्ये अंजनगावचे नायब तहसीलदार मंगेश सोळंके, ठाणेदार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र डंबाले तसेच पूर्व मेळघाट वनविभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार, विभागीय दक्षता अधिकारी एच.एस. वाघमोडे, सहायक वनसंरक्षक अशोक राम पऱ्हाड, वनपरिक्षेत्र अधिकारी ओमप्रकाश पेंदोर यांच्या मार्गदर्शनात एटीपीएफ अकोटच्या महिला वनकर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले. वनविभागाच्या जंगलात अतिक्रमण दिसल्यास माहिती देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
अंजनगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिंचोना बीटमध्ये अतिक्रमण करणाºया १९ मेंढपाळांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
- अविनाश कुमार, उपवनसंरक्षक, पूर्व मेळघाट वनविभाग, चिखलदरा