चिरोडी जंगलातून मेंढपाळांच्या मेंढ्या बंदिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:53+5:302021-07-11T04:10:53+5:30
वनविभागाकडून कारवाईला प्रारंभ, जंगलाची अधोगती थांबणार पोहरा बंदी : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील हातला बीट वन ...
वनविभागाकडून कारवाईला प्रारंभ, जंगलाची अधोगती थांबणार
पोहरा बंदी : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील हातला बीट वन खंड क्रमांक ३१३ मध्ये अवैध चराईसाठी आणलेल्या मेंढपाळांच्या तीन मेंढ्या बंदिस्त करण्यात आल्या. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास वनविभागाने ही कारवाई केली. वनविभागाचे पथक पाहून मेंढपाळ ५० ते ६० मेंढ्यांचा कळप जंगलातून बाहेर काढण्यात यशस्वी झाले. त्यांच्या तीन मेंढ्या ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले. ताब्यात घेतलेल्या या मेंढ्यांना वनविभागाच्या वाहनातून कारला कोंडवाड्यात बंदिस्त केले. या पहिल्या कारवाईमुळे मेंढपाळामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राखीव जंगलात चराई करण्यास पूर्णतः बंदी आहे. असे असतानासुद्धा चिरोडी जंगलात मेंढ्या चराई करताना आढळताच जंगल परिसरात छापा मारून तीन मेंढ्या ताब्यात घेतल्या. चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिरोडी वर्तुळ अधिकारी एस.एस. अली, चांदूर रेल्वे वर्तुळ अधिकारी किशोर धोत्रे, वनरक्षक राजन हिवराळे, दीपा बेले, राहुल कैकाडे, गोविंद पवार, वनमजूर शेख रफीक, रामू तिडके, वसंत राठोड, प्रेम राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. वनरक्षक राजन हिवराळे यांनी वनगुन्हा जारी केला, तर वनपाल एस.एस. अली हे पुढील चौकशी करीत आहेत.