मेंढपाळ-वनकर्मचाऱ्यांत चिरोडी जंगलात संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 09:58 PM2018-07-14T21:58:29+5:302018-07-14T21:58:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : वनचराईवर बंदी असताना चिरोडी वर्तुळातील वनखंड क्रमांक ३०७ सावंगा बिटमध्ये चार मेंढ्या बंदिस्त करण्यात आल्या. या जंगलात वनकर्मचाऱ्यांनी काठेवाडी गुरे व मेंढ्यांना चराईसाठी बंदी घातल्याने शनिवारी सावंगा बिटमध्ये मेंढपाळ व वनकर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष पेटला. मेंढपाळ वनरक्षकाच्या अंगावर काठी घेऊन धावल्याने मेंढपाळ व वनकर्मचाऱ्यांत संघर्ष निर्माण झाला.
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी जंगलात मेंढपाळांमुळे या जंगलाचे नुकसान टाळण्यासाठी पाहरा-चिरोडी वनकर्मचाऱ्यांनी गस्त वाढविली आहे. जंगलाशेजारी दहा ते बारा ठिकाणी काठोवडी, मेंढपाळांची राहुटी असून, त्यांच्याकडे सुमारे ५ ते १० हजार गुरे व मेंढ्या आहेत. वनविभागाने यंदा जंगलात चराईवर बंदी घातली होती. शनिवारी सावंगा बीटमध्ये राखीव रोपवनात मेंढ्या चराई करताना आढळल्या. वनाधिकाऱ्यांचे पथक पाहून मेंढपाळांनी २०० मेंढ्या पळविल्या. घटनास्थळी ४ मेंढ्या पकडल्याने वनकर्मचारी व मेंढपाळ यांच्यात संघर्ष पेटून एकमेकांवर धावून आले.
या पथकाने केली कारवाई
चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिरोडी वर्तुळाचे वनपाल एम.के. निर्मळ, वनरक्षक अलका मंजुळकर, राजन हिवराळे, रवींद्र विधळे, गोविंद पवार, अभिजित बगळे, अभिषेक कथलकर, वनमजूर रफिक शेख, मंगल जाधव, रामु तिळके, राजू चव्हाण, शालिक पवार यांनी सहकार्य केले. चिरोडी वर्तुळाचे वनपाल एम.के. निर्मळ यांनी वनगुन्हा जारी केला असून, पुढील चौकशी करीत आहे.