आष्टीतील दारू दुकानाचे स्थलांतरण
By Admin | Published: March 27, 2015 12:02 AM2015-03-27T00:02:03+5:302015-03-27T00:02:03+5:30
भातकुली तालुक्यातील आष्टी येथील देशी दारु दुकान गावापासून २ किलोमीटर अंतरावर दोन महिन्यांच्या आत स्थलांतरित करावे, ...
अमरावती : भातकुली तालुक्यातील आष्टी येथील देशी दारु दुकान गावापासून २ किलोमीटर अंतरावर दोन महिन्यांच्या आत स्थलांतरित करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आदेशांचे पालन न झाल्यास या दारू दुकानाचा परवाना रद्द केला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
भातकुली तालुक्यातील आष्टी येथील प्रकाश तुळशीराम जयस्वाल या परवानाधारकांचे दारु विक्रीचे गावात दुकान आहे. हे दुकान मध्यवस्तीत असल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, शेतमजूर व गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महिलांचे जीवन असुरक्षित झाले असून गावातील शांततादेखील धोक्यात आली आहे. त्यामुळे हे दुकान गावाबाहेर स्थलांतरित करावे, अशी गावकऱ्यांची मागणी होती.
सदर दुकानाचे मालक हे नियमांना बगल देत बाहेरगावी दारु विक्री करीत असल्याची तक्रार गावकऱ्यांची आहे. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीने ग्रामसभा व मासिक सभेत ठराव घेऊन दारुविक्रीचे दुकान हद्दपार करण्याचा ठराव पारित केला. दरम्यान गावातील महिलांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सादर करुन देशी दारु विक्रीचे दुकान स्थलांतर करण्याची मागणी रेटून धरली होती. गावकऱ्यांच्या मागणीला अनुसरुन जिल्हाधिकाऱ्यांनी सदर दारुविक्रीचे दुकान हे गावठानपासून दोन कि. मी. अंतरावर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने गावकऱ्यांना दिलासा मिळाला. दुकानांच्या स्थलांतराचा आदेश पोलीस आयुक्त, पोलीस ठाणे, सरपंच व सचिव ग्रामपंचायत, पद्माताई जवंजाळ, रमा खोडके, सुरेखा रायबोले, लिलाबाई कडू आदींना पाठविला आहे. (प्रतिनिधी)