शिरजगाव ‘पाणीदार’ होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 01:02 AM2019-05-04T01:02:20+5:302019-05-04T01:02:47+5:30
यंदाच्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि बागायती शेतीला पुन्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी येथील तरुणांनी पुढाकार घेऊन ‘गाव माझा विकास समिती’ची स्थापना केली आहे. या समितीच्या पुढाकाराने तब्बल आठ लाख रुपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली.
मनोहर सुने।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरजगाव कसबा : यंदाच्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि बागायती शेतीला पुन्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी येथील तरुणांनी पुढाकार घेऊन ‘गाव माझा विकास समिती’ची स्थापना केली आहे. या समितीच्या पुढाकाराने तब्बल आठ लाख रुपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली. त्यातून नाला खोलीकरण व जलसंधारणासाठी आवश्यक असलेली कामे हाती घेण्यात आली आहेत. तरुणाईच्या या प्रेरक प्रयत्नांमुळे शिरजगाव कसबाची ‘पाणीदार’ गावाकडे वाटचाल सुरू झाली आहे.
चांदूरबाजार तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्येचे गाव म्हणून ओळख असलेल्या शिरजगाव कसबा येथे काही वर्षांपासून भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. परिसरातील ९० टक्के शेती ओलिताखाली असल्याने पाण्याची नितांत गरज आहे. संत्रा झाडे जगविण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज असल्याने बोअर व विहिरी करण्यात आल्या. मात्र, बेसुमार उपशामुळे या भागातील पाणीपातळी अत्यंत खोल गेली आहे. विहिरीची १५०, तर बोअरची पातळी २०० ते २५० फुटांखाली गेली आहे. त्यामुळे पेयजलासोबत सिंचनाची समस्या उभी ठाकली. त्या अनुषंगाने गावातील काही युवकांनी ‘गाव माझा विकास समिती’ स्थापन करून गावातील पाणीप्रश्नावर कार्यास प्रारंभ केला. ही समिती जनजागृती बैठका, सभा घेऊन पाणीटंचाईची माहिती देत आहे.