मेळघाटात आढळला दुर्मिळ 'शिटीमार रानभाई'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 08:38 PM2018-10-22T20:38:01+5:302018-10-22T20:38:25+5:30
मेळघाटात दुर्मिळ 'शिटीमार रानभाई' पक्षी आढळून आल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटात दुर्मिळ 'शिटीमार रानभाई' पक्षी आढळून आल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. हा पक्षी मुख्यत: पूर्व आणि पश्चिम घाटात आढळत असल्याने मध्य भारतातील ही दुर्मिळ नोंद आहे.
मेळघाटात एका पक्षी सर्वेक्षणादरम्यान युथ फॉर नेचर कन्झवळेशन सोसायटीचे धनंजय भांबूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या पक्षाचे दर्शन झाले. त्याची फोटोवरून ओळख पटविण्यास अभिमन्यू आराध्य व पक्षी अभ्यासक कृष्णा खान यांची मदत झाली.
हा साधारणत: चिमणी पेक्षा थोडा लहान पक्षी आहे. एका रहिवासी पक्ष्याची ही पोटजात आहे. आखूड चोच, चेहरा व शेपूट तपकीरी, डोके राखाळी, पाठ मेंहदी रंगाच्या पंखांनी झाकली असून उदर पिंगट-पिवळसर असते. परागकण आणि छोटे किडे त्याचे आवडते खाद्य आहे. २००९ मध्ये हा पक्षी दिसल्याची विदेशी निरीक्षकांची नोंद आहे, अशी माहिती भांबूरकर यांनी दिली. पूर्वी या पक्ष्याची गणना 'फुलवेटा' या कुळात होत असे मात्र, नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनामुळे आता हा पक्षी 'अॅलसेपी' या कुळात मोडत असून, याला इंग्रजीत 'ब्राऊन-चिक अॅलसेपी' असे म्हटले जाते. यापूर्वी शिटीमार मध्यभारतात १९३५ साली मध्यप्रदेशातील पंचमढी आणि बालाघाट व १९३९ साली बैतूल जिल्ह्यात आढळल्याची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संशोधन पत्रिकेत नोंद असल्याने महाराष्ट्रातील मेळघाटात या पक्ष्याचे वास्तव्य अत्यंत दुर्मिळ योग आहे, असे पक्षी अभ्यासक कृष्णा खान यांनी सांगितले.