केवळ १०० रुपयांसाठी हूक, चाकूने वार करून शिवभक्त गोलूचा खून !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:57 PM2024-10-17T12:57:10+5:302024-10-17T13:00:35+5:30
कुटुंबीय, जमावाचा सिटी कोतवालीसमोर ठिय्या : दोन्ही आरोपींना तातडीने अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शंभर रुपये मागितल्यावर केवळ २० रुपयेच दिल्याने झालेल्या वादात एकाची चाकूने वार करून निघृण हत्या करण्यात आली. १५ ऑक्टोबर रोजी रात्री १०:४५ च्या चित्रा चौकात ही थरारक घटना घडली. निशांत ऊर्फ गोलू सुनील उसरेटे (३१, रा. तिसरा नागोबा, रतनगंज, अमरावती) असे मृताचे नाव आहे.
आरोपींना त्वरेने पकडण्याची मागणी करून गोलूच्या कुटुंबीयांसह त्याची मित्रमंडळी व जमावाने बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास सिटी कोतवाली पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला. ४०० ते ५०० च्या संख्येत असलेल्या त्या जमावाने पोलिसांविरुद्ध घोषणाबाजीही केली. त्यानंतर दोन्ही आरोपींसह अन्य एकाला अटक करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी, गोपाल चव्हाण (वय ४१, रा. रतनगंज) याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी १६ ऑक्टोबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास आरोपी विक्की परशूराम गुप्ता (३५, रतनगंज) व योगेश गजानन गरूड (३०, रा. विलासनगर) या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यात विक्की व योगेशसह कमल उर्फ रोशन रमेश साहू (३२, रा. रतनगंज) याला देखील अटक करण्यात आली. विक्की व रोशनला पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले यांच्या स्पेशल स्कॉडने तर, एपीआय महेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वातील सीआययूने ताब्यात घेतले. निशांत ऊर्फ गोलू हा सन २००७ पासून जयभोले कावडयात्रा काढत होता.
गोलूच्या मृत्यूमुळे त्याची केवळ दहा दिवसांची नवजात कन्या पोरकी झाली आहे. शिवभक्त गोलूची हत्या झाल्याचे समजताच शेकडोंचा जमाव कोतवाली ठाण्यासमोर जमा झाला. आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. उपायुक्त गणेश शिंदे, एसीपी जयदत्त भंवर, कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. आ. रवी राणा, डॉ. सुनील देशमुख, विलास इंगोले व बबलू शेखावत हे देखील कोतवालीसमोर पोहोचले. मात्र जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. दरम्यान, आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ती माहिती संतप्त जमावाला देण्यात आली. त्यानंतर सुमारे ४०० ते ५०० लोकांचा तो जमाव शांत झाला. मृताचे शवविच्छेदन करण्यात आले.
एकाने हूक, दुसऱ्याने चाकू भोसकला
गोलू हा विक्की गुप्ताशी बोलत होता. त्याचवेळी विक्कीने लोखंडी हुकने त्याच्यावर हल्ला चढविला; तर योगेश गरुड याने गोलूच्या डोक्यावर व छातीवर चाकूने भोसकले. त्यामुळे गोलू रक्तबंबाळ झाला. त्याला तसेच टाकून आरोपींनी पळ काढला. गोपाल व समीर यांनी गोलूला इर्विनमध्ये आणले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्यावेळी इर्विन व घटनास्थळीही मोठा जमाव जमला होता. तेथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
अशी घडली घटना
फिर्यादी गोपाल चव्हाण, निशांत ऊर्फ गोलू उसरेटे व समीर तायडे हे तिघे त्यांच्या अपघातग्रस्त मित्रांना पाहण्यासाठी मंगळवारी रात्री इर्विनला गेले होते. तेथून घरी परतत असताना गोलू हा गोपालची बाईक चालवत होता. ते चित्रा चौकात आले असता मोपेडवर असलेल्या त्यांच्याच मोहल्ल्यातील आरोपी विकी गुप्ता व योगेश गरूडने गोलूला थांबविले. विक्कीने गोलूकडे १०० रुपये मागितले. त्यावर त्याने केवळ २० रुपये दिले. वीसच रुपये दिल्याने योगेश गरुडने गोलूला चाकूने मारण्याची धमकी दिली. त्यावर ये हमारे मोहल्ले की बात है, तू क्यूँ बोल रहा?' अशी विचारणा गोलूने त्याला केली.