पश्चिम विदर्भात १९५० व्यक्तींना रोज शिवभोजन थाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 07:06 PM2020-01-02T19:06:57+5:302020-01-02T19:07:17+5:30
गरीब व गरजू नागरिकांना आता १० रुपये या दराप्रमाणे शिवभोजन थाळी उपलब्ध करण्यात येणार आहे.
अमरावती : गरीब व गरजू नागरिकांना आता १० रुपये या दराप्रमाणे शिवभोजन थाळी उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी पश्चिम विदर्भात प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे वर्दळीच्या २२ जागांची पुरवठा विभागाद्वारे पाहणी करण्यात आली. यापैकी पाच ठिकाणी ही केंद्रे मंजूर करण्यात येणार आहेत. या पाच केंद्रांवर रोज १९५० व्यक्तींना सवलतीच्या दरात थाळी मिळणार आहे.
दरम्यान अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी ३० डिसेंबरला पुरवठा उपायुक्त व जिल्हा पुरवठा अधिका-यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेऊन सूचना दिल्या व याविषयीचा शासनादेशदेखील बुधवारी निर्गमित केलेला आहे. विभागात अमरावती जिल्ह्यात ५००, अकोला ३००, बुलडाणा ४००, वाशीम ३०० व यवतमाळ जिल्ह्यांत ४५० अशी थाळ्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. या केंद्रांकरिता तीन ते चार जागांची पाहणी करण्याचे निर्देश पुरवठा विभागाद्वारे देण्यात आलेले होते. या प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी किमान २५ व्यक्ती भोजनाला बसू शकतील एवढी जागा आवश्यक असल्याचे पत्रात नमूद आहे.
शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या भोजनालयात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅम भात व १०० ग्रॅमचे वरण समाविष्ट असणारी शिवभोजनाची थाळी जिल्हा ठिकाणी मंजूर भोजनालयात दुपारी १२ ते २ या कालावधीत मिळणार आहे. यासाठी शहरी भागात ४० व ग्रामीण भागात २५ रुपये प्रतिथाळी अनुदान देय राहणार आहे.
अमरावतीमध्ये सर्वाधिक ७ जागांचे प्रस्ताव
जिल्ह्याचे ठिकाणी एक केंद्र राहणा-या या योजनेत भोजनालय चालविण्यासाठी पश्चिम विदर्भात २२ जागांचे प्रस्ताव समोर आले आहेत. यामध्ये अमरावती शहराकरिता सर्वाधिक सात जागांचे प्रस्ताव आहे. याव्यतिरिक्त अकोला जिल्ह्यात तीन, वाशीम जिल्ह्यात तीन, यवतमाळ जिल्ह्यात चार व बुलडाणा जिल्ह्यात चार जागांचे प्रस्ताव पुरवठा विभागाकडे आहेत. या सर्व वर्दळीच्या ठिकाणांपैकी एका ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.