अमरावतीत खासदार-आमदार राणा दाम्पत्यांचे पोस्टर शिवसैनिकांनी फाडले
By गणेश वासनिक | Published: July 9, 2023 05:32 PM2023-07-09T17:32:31+5:302023-07-09T17:35:12+5:30
राणा दाम्पत्यांकडून श्रावणमासाच्या निमित्ताने येथील गर्ल्स हायस्कूल चौकात सोमवारी सकाळी ९ ते २ वाजता दरम्यान सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी सायंकाळी ७ वाजता अमरावतीत येत आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्यासाठी लावण्यात आलेले पोस्टर शिवसैनिकांनी फाडून फेकले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वीची अमरावती शहरात राजकीय वातावरण तापले असून पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.
राणा दाम्पत्यांकडून श्रावणमासाच्या निमित्ताने येथील गर्ल्स हायस्कूल चौकात सोमवारी सकाळी ९ ते २ वाजता दरम्यान सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनासंदर्भात राणांनी शहरात जागोजागी पोस्टर लावले आहे. मात्र, या पोस्टरवर उद्धव ठाकरे सरकारने हनुमान चालिसा पठणाला विरोध केला आणि हनुमान चालिसा वाचल्याबद्दल खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. १४ दिवस जेलमध्ये टाकले, अशा आशयाचे मजकूर होते. पोस्टरवरील हे मजकूर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या जिव्हारी लागल्याने ते पोस्टर फाडून फेकले. आता याविषयी राणा दाम्पत्य कोणती भूमिका घेतात, याकडे नजरा लागल्या आहेत. राणा समर्थकांनी हे पोस्टर उद्धव ठाकरे यांच्या स्वागताच्या बॅनरखाली लावल्याने ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आणि ते पोस्टर फाडले.
बॅनरबाजीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता
सोमवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांचा मुक्काम असलेल्या परिसरातच राणा दाम्पत्यांनी सकाळी ९ वाजतापासून हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे ठिकठिकाणी लावले आहे. मात्र, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी हे बॅनर्स फाडून टाकले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी हनुमान चालिसा पठण करून राणा दाम्पत्यांचा निषेध केला. शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे यांनी आणि शिवसैनिकांनी शहरातील राणा दाम्पत्यांनी लावलेले पोस्टर फाडले.