शिवसेनेकडून भाजप कार्यालयाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 05:00 AM2021-08-25T05:00:00+5:302021-08-25T05:00:57+5:30
संकुलाच्या बेसमेंटमध्ये एकत्र आलेल्या शिवसैनिकांनी हाती डिझेलची कॅन घेऊन भाजप कार्यालयावर हल्लाबोल केला. तेथील बॅनर, पोस्टर फाडून टाकले. काही जाळले. पाण्याच्या जारची तोडफोड करण्यात आली. नामफलकावर शाई फेकण्यात आली. काहींनी दगडफेक केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. सुमारे अर्ध्या तासाच्या या तडक आंदोलनाची शिवसैनिकांकडूनच व्हिडीओ शूटिंग करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद अमरावतीतदेखील उमटले. शिवसेनेचे महानगरप्रमुख पराग गुडधे, श्याम धाने व अन्य शिवसैनिकांनी भाजपच्या राजापेठ स्थित कार्यालयाच्या आवारातील फलकांची जाळपोळ केली. तेथे दगडफेक करून भाजप व राणेंविरोधी नारेबाजी करण्यात आली. मंगळवारी सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले.
संकुलाच्या बेसमेंटमध्ये एकत्र आलेल्या शिवसैनिकांनी हाती डिझेलची कॅन घेऊन भाजप कार्यालयावर हल्लाबोल केला. तेथील बॅनर, पोस्टर फाडून टाकले. काही जाळले. पाण्याच्या जारची तोडफोड करण्यात आली. नामफलकावर शाई फेकण्यात आली. काहींनी दगडफेक केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. सुमारे अर्ध्या तासाच्या या तडक आंदोलनाची शिवसैनिकांकडूनच व्हिडीओ शूटिंग करण्यात आले. ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासह भाजपचे तुषार भारतीय व पदाधिकारी पोहोचले. तात्काळ क्यूआरटी पथकासह अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली. राजकमल चौकात निदर्शनादरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, डिगंबर मानकर, अर्चना धामणे, नितीन सायवान, गुरू गिंगमिरे, अतुल थोटांगे, विनोद सुनील डहाके खडसे, विकास शेळके, ललित झंझाड उपस्थित होते.
राणेंचा ‘कोंबडीचोर’ म्हणून नामोल्लेख
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्यप्रकरणी शिवसेनेच्यावतीने शहर कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल अपशब्द हा जनतेचा अपमान आहे. नारायण राणे यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.