शिवभोजनाला लग्न समारंभातून अन्न मिळावं, बच्चू कडूंची भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 06:09 PM2020-01-26T18:09:52+5:302020-01-26T18:10:35+5:30
जिथं जिथं अन्नदान आणि जेवणाचा कार्यक्रम आहे, तेथून शिवभोजन थाळीसाठी
अमरावती - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन योजनेला आजपासून सुरुवात करण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, अमरावती जिल्ह्यातील बाजार समिती परिसरात या शिवभोजनालयाचे उद्घाटन करताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. तर, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ज्यांची ऐपत असेल त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन केले.
अजित पवार यांनी पुण्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईत तर बच्चू कडू यांनी अमरावती येथे या योजनेचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी भावनिक साद घातली. शिवभोजनाचा आनंद आहे, पण आपण जेवण कोणाला देतोय याचं दु:ख आहे. कारण, 10 रुपयांत जेवण जेवण्याची वेळ आमच्या शेतकऱ्यांवर, लोकांवर का येते हा चिंतेचा विषय आहे, असे कडू यांनी म्हटले. तसेच, आपण सर्वांनी शिवभोजनासाठी साथ आणि मदत केली पाहिजे. शिवभोजनाची व्याप्ती वाढविण्यासाठी आपलेही सहाकार्य गरजेचं आहे. एखाद्या लग्नसमारंभाच्या ठिकाणी जेवणाच्या पंगती बसतात. मग, याच मंगलकार्यालयातून शिवभोजनासाठी काही अन्न लाभलं तर नक्कीच हे स्वागतार्ह पाऊल असेल, असेही ते म्हणाले.
जिथं जिथं अन्नदान आणि जेवणाचा कार्यक्रम आहे, तेथून शिवभोजन थाळीसाठी अन्न यायला हवं. आपला सहभाग लाभल्यास या योजनेची व्याप्ती नक्कीच वाढेल. माझ्या आईनं आमच्या घराशेजारी असलेल्या मानसिक रुग्णाला 25 वर्षे दोन वेळचं जेवण दिलं. भूक भागविण्यासाठी माती खाणारा तो रुग्ण जेवण करायला लागला. आम्ही प्रहारच्या माध्यमातून 700 लोकांना जेवणाचा दररोज डब्बा पुरवतो. कारण, परिस्थिती भीषण असून भूकेल्यांची संख्या जास्त आहे. नातं हे जाती-धर्मातून नव्हे तर सेवेतून निर्माण करता आलं पाहिजे, असे म्हणत बच्चू कडू यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली.