शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:35 PM2019-06-24T22:35:49+5:302019-06-24T22:36:49+5:30
शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा १२ फुटी ब्रांझचा अश्वारुढ पुतळा त्याच ठिकाणी बसविण्यासाठी कंत्राटदारासोबत करारनामा करण्यास सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 'क्ले मॉडेल'ला कला संचालनालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुतळ्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती सभापती बाळासाहेब भुयार यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा १२ फुटी ब्रांझचा अश्वारुढ पुतळा त्याच ठिकाणी बसविण्यासाठी कंत्राटदारासोबत करारनामा करण्यास सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 'क्ले मॉडेल'ला कला संचालनालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुतळ्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती सभापती बाळासाहेब भुयार यांनी दिली.
स्थायी समितीच्या बैठकीत तांत्रिक कारणाने आठ विषय रद्द करण्यात आले. दोन विषयांना मान्यता देण्यात आली. शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा १२ फुटी ब्रांझचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासंदर्भात पुतळा समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ७ जानेवारी २०१९ ला प्रथम निविदा उघडण्यात आली. मात्र, यात दोनच निविदा आल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातही प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी तीन निविदा प्राप्त झाल्यात. मात्र, एका निविदाधारकाने कागदपत्राची पूर्तता केली नसल्यामुळे दोनच निविदा ग्राह्य धरण्यात आल्यात. यामध्ये गर्गे आर्ट्स स्टुडीओ ५८ लाख व श्री शिल्पाज आर्ट वर्क्स ४८.२५ लाख रुपयांची निविदा भरण्यात आली. यात ‘शिल्पाज’ची निविदा मंजूर करून कंत्राटदारासोबत करारनामा करण्यासाठी ७ फेब्रुवारीच्या आमसभेत हा विषय ठेवण्यात आला. या सभेत दुरूस्ती सुचविण्यात आली.
आचारसंहितेपश्चात समितीच्या बैठकी रद्द झाल्यात. त्यानंतर सोमवारच्या बैठकीत हा विषय ठेवण्यात आला. शिवटेकडीवर सध्या शिवाजी महाराजांचा १२ फुटी ब्रांझचा अश्वारूढ पुतळा अस्तित्वात आहे. त्याच डिझाईनचा नवा पुतळा राहणार असून, नव्याने झालेल्या निविदा प्रक्रियेत कलासंचालनालयाची मंजुरी, या विषयाची अट टाकण्यात आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे सदर कंत्राटदारासोबत करारनामा करण्यासंदर्भात प्रशासनाच्यावतीने रविवारच्या बैठकीत विषय ठेवण्यात आल्यानंतर सभेने मंजुरी दिली आहे.
महापौरांच्या ‘ब्रिस्ब्रेन’ दौऱ्याला मंजुरी
आॅस्ट्रेलियातील ब्रिस्ब्रेन येथे ७ ते १० जुलैदरम्यान होणाऱ्या आशिया पॅसिफीक सिटीज् सुमित २०१९ या परिषदेत उपस्थित राहण्यासाठी महापौर संजय नरवणे यांना निमंत्रण आलेले आहे. या दौºयासाठी ४.८५ लाखांचा खर्च येणार आहे. याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा मान्यतेचा ठराव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सभापती बाळासाहेब भुयार यांनी सांगितले. आयुक्त संजय नरवणे यांनी २० जून रोजी या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे.