शिवाजी महाराज लोकहिताचे मूल्य जपणारे राजे; शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवटेकडीवर व्याख्यान
By उज्वल भालेकर | Published: February 19, 2024 06:37 PM2024-02-19T18:37:54+5:302024-02-19T18:38:09+5:30
बालवख्याती आराध्या गजाननराव ठाकरे व राधा मनोज जुमळे यांचे देखील व्याख्यान झाले.
अमरावती: राजेशाही काळात शेतीविषयक धोरण आखून पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे, शेतकऱ्यांसाठी सहकारी बँकांची निर्मिती करणे, शेतकऱ्यांना कर्ज पुरवण्याची योजना करणे, दुष्काळी वर्षात शेतसारा वसूल न करणे या धोरणामुळेच छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे स्वराज्य निर्माण करू शकले. त्यामुळेच लोकहिताची मूल्य जोपासणारे राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असल्याचे मत रवी मानव यांनी सोमवारी शिवटेकडी येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रम व स्पर्धांनी युक्त अशी शिवजयंतीचा उत्सव शिवटेकडी अमरावती येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मनपा चे आयुक्त देविदास पवार, तुषार भारतीय, मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे, माजी महापौर विलास इंगोले, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस किशोर बोरकर, माजी नगरसेवक बबलू शेखावत, युवक काँग्रेसचे भैय्या पवार, माजी नगरसेवक बंडू हिवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद इंगोले, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजली ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या मनाली तायडे, महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक राजू भेले, डॉक्टर पंजाबराव देशमुख को-ऑपरेटिव बँकेचे संचालक राजेंद्र महल्ले, नितीन पवित्रकार, गजानन राजगुरे उपस्थित होते.
यावेळी बालवख्याती आराध्या गजाननराव ठाकरे व राधा मनोज जुमळे यांचे देखील व्याख्यान झाले. शिवजयंती घराघरात शिवराय मनामनात अशा विचाराद्वारे शिवजयंतीसाठी लोकांची उपस्थिती वाढवण्यासाठी विविध उपाय योजना करून लोकांना शिवरायांचे चरित्र सांगून सुसंस्कृत समाज निर्माण करता येईल असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना अश्विन चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी शिवटेकडी येथील दर्ग्याचे मुजाहिर अन्वर भाई यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.