अमरावती विद्यापीठात शिवाजी महाराज विचारधारा, महात्मा फुले अध्यासन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:53 PM2018-12-11T12:53:14+5:302018-12-11T13:04:22+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नव्याने छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन या विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रमाची (पीजी) मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नव्याने छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन या विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रमाची (पीजी) मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राची स्थापना केली जाणार असून, १३ डिसेंबर रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या दोन्ही विषयांवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत.
कुलगरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे समाजाच्या विविध घटकांमधून आलेल्या मागणीनुसार प्रशासनाने राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने त्याकरिता पाठपुरावा केला. शासनावर खर्चाचा भार पडणार नाही, असा कोणताही प्रस्ताव पाठवू नये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यापीठाला कळविले आहे. मात्र, समाजाभिमुख निर्णय घ्यायचे असल्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीेठ अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार, व्यवस्थापन परिषदेला त्याअनुषंगाने निर्णय घेता येतो. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन या विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रम आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या स्थापनेस मान्यता प्रदान करण्यासाठी हा विषय व्यवस्थापन परिषदेकडे पाठविला आहे. या दोन्ही नव्या उपक्रमासाठी लागणारा खर्च कुलगुरुंच्या अधिकारातील खर्चामधून केला जाणार आहे. शासनाकडे कोणत्याही प्रकारच्या खर्चाचा भार विद्यापीठाने दिला नाही. शिक्षण संचालकांच्या आदेशाप्रमाणे हे दोन्ही उपक्रम सुरू करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. पदे व निधी शासन देणार नाही, हे स्पष्ट असल्याने विद्यापीठ प्रशासनाने स्थानिक पातळीवर नियोजन केले आहे. शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रमाची मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अमोल निस्ताने, तर क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राची स्थापना करण्याची मागणी उपेक्षित समाज महासंघाने केली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने वाटचाल चालविली आहे.
‘‘ समाजातून आलेल्या मागणीचा विचार करूनच महापुरुषांच्या विचारधारेचे अभ्यासक्रम, अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासन कार्यवाही करेल.
- मुरलीधर चांदेकर,
कुलगुरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ