‘शिवाजी’ची निवडणूक रविवारी; ‘पाटील’ की ‘देशमुख’, बाप्पा कोणाला पावणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 01:41 PM2022-09-10T13:41:39+5:302022-09-10T13:44:40+5:30
आजीवन सभासदांच्या पाल्यांना नोकरी, कुटुंबातील सभासदाचा मुद्दा गाजणार
अमरावती : येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. शिवाजीचा रणसंग्राम गणेशोत्सवाच्या काळात चांगलाच रंगत असून, यंदा ‘पाटील की देशमुख’ कोणाला बाप्पा पावणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, यंदाची निवडणूक आजीवन सभासदांच्या पाल्यांना कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नव्याने ‘शिवाजी’त सभासदत्वाचा मुद्दा गाजणार आहे. नरेशचंद्र ठाकरे आणि हर्षवर्धन देशमुख यांच्यात काट्याची लढत असल्याचे चित्र आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेला आतापर्यंत बाबासाहेब घारफळकर, दादासाहेब काळमेघ, रावसाहेब इंगोले, वसंतराव धोत्रे, अरुण शेळके अशा अध्यक्षांचे नेतृत्व लाभले आहे. आता हर्षवर्धन देशमुख यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला आहे. मागील निवडणुकीत अरुण शेळकेंच्या विरोधात विविध गटांनी एकत्र येऊन हर्षवर्धन देशमुखांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत ‘पाटील’ ‘देशमुख’ वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यामुळे मतदार आता कुठला निर्णय घेतात? हे ११ तारखेचा निकाल अवलंबून राहणार आहे.
मागील निवडणुकीत अरुण शेळके आणि हर्षवर्धन देशमुख यांच्यात ७० मतांच्या जवळपास अंतर होते. आता सपकाळ गट प्रामुख्याने ठाकरेंच्या विकास पॅनलसोबत असल्याने त्यांच्याकडे मजबूत पाठिंबा आहे. मात्र यंदा शेळके गटाची भूमिका ‘वेट ॲण्ड वॉच’ असली तरी शेळकेंचा लाभ विकास पॅनेललाच होईल, असे प्रथमदर्शनी दिसून येते. काहीही असले तरी यंदा ‘शिवाजी’ची निवडणूक आजीवन सभासदांच्या पाल्यांना कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांच्या कुटुंबात नव्याने सभासदत्व बहाल करणे या दोन प्रमुख मुद्द्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे हे दोनही मुद्दे जी व्यक्ती सोडवू शकेल, ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांच्याच पाठीशी आजीवन सभासद उभे राहतील, हे वास्तव आहे. गत पाच वर्षांचा सत्तापक्षाचा अनुभव आजीवन सभासदांनी घेतला आहे. आता पुढे काय करावे, हे दि. ११ सप्टेंबर रोजी मतपेटीतून ते दाखवून देतील, अशीही चर्चा जोर धरू लागली आहे.
शिवाजी संस्थेत अशी आहे मतदार संख्या
श्री शिवाजी शिक्षण संस्थेत साधारणपणे देशमुख मतदारांची संख्या ८०च्या घरात असून, इतर एकूण १५० मते तर उर्वरित सर्व ४८०च्या वर मते ही पाटलांची आहेत. त्यामुळे संख्याबळ लक्षात घेता, प्रत्येक पॅनलमध्ये पाटील उमेदवारांची संख्याच अधिक असते. यंदाची निवडणूक पहिल्यांदाच आजीवन सभासदांच्या पाल्यांना नोकरी आणि त्यांच्या कुटुंबातील नव्याने सभासदत्व यावर ‘फोकस’ झाली आहे. त्यामुळे बाजी कोण मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.