‘शिवाजी’त रंगणार ‘विकास’ विरुद्ध ‘प्रगती’मध्ये सामना; ‘देशमुख राज’ की ‘ठाकरे शाही’? सप्टेंबरमध्ये होणार निर्णय

By गणेश वासनिक | Published: July 22, 2022 10:34 AM2022-07-22T10:34:20+5:302022-07-22T10:38:12+5:30

गत पाच वर्षांत मांडीला मांडी लावून बसणारे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे दाेघेही परममित्र आता अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी राजकीय वैरी झाल्याचे चित्र आहे.

'Shivaji' will feature 'Vikas' versus 'Pragati'; 'Harshvardhan Deshmukh Raj' or 'Nareshchandra Thackeray Shahi'? A decision will be made in September | ‘शिवाजी’त रंगणार ‘विकास’ विरुद्ध ‘प्रगती’मध्ये सामना; ‘देशमुख राज’ की ‘ठाकरे शाही’? सप्टेंबरमध्ये होणार निर्णय

‘शिवाजी’त रंगणार ‘विकास’ विरुद्ध ‘प्रगती’मध्ये सामना; ‘देशमुख राज’ की ‘ठाकरे शाही’? सप्टेंबरमध्ये होणार निर्णय

Next
ठळक मुद्देआजीवन सदस्यांची आतापासून मनधरणी सुरू

गणेश वासनिक

अमरावती : राज्यात ‘रयत’नंतर दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावारूपास आलेल्या अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक येत्या सप्टेंबर महिन्यात होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते. त्या अनुषंगाने विकास आणि प्रगती अशा दोन पॅनलची घोषणा झाली आहे. मात्र, गत पाच वर्षांत मांडीला मांडी लावून बसणारे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे दाेघेही परममित्र आता अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी राजकीय वैरी झाल्याचे चित्र आहे. ‘विकास’ची धुरा नरेशचंद्र ठाकरे यांच्याकडे, तर ‘प्रगती’चे नेतृत्व हर्षवर्धन देशमुख हे करणार आहेत.

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्याद्वारा स्थापित ‘शिवाजी’ संस्थेचे कालांतराने शिवपरिवारात रूपांतर झाले. अमरावती, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, नागपूर, आदी जिल्ह्यांमध्ये या संस्थेने शाळा, महाविद्यालयांच्या रूपात जाळे विणले आहे. ‘शिवाजी’ची संस्थापक घटनादेखील वेगळी आहे. आजीवन सभासदांमधूनच पंचवार्षिक कार्यभारासाठी अध्यक्ष, तीन उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, तर चार कार्यकारिणी सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात येते. खरे तर ‘शिवाजी’चे आजीवन सभासद हे एकमेकांचे स्नेही, नातेवाईक असल्याचे बोलले जाते.

मात्र, यावेळी निवडणूक वेगळ्या वळणावर जाणार असल्याचे संकेत आहेत. ठाकरे विरुद्ध देशमुख? असा हा सामना रंगणार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते; परंतु, दोन्ही पॅनलचे राजकीय अस्तित्व हे अमरावती येथे सर्वाधिक मतदार असलेल्या आजीवन सभासदांवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे ‘शिवाजी’त सप्टेंबर महिन्यात ‘ठाकरे शाही’ की ‘देशमुख राज’? कोण सत्तास्थानी असेल, हे निश्चित होईल.

नरेशचंद्र ठाकरे का वेगळे झाले?

श्री शिवाजी शिक्षण संस्थेत उपाध्यक्ष असलेले माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे हे हर्षवर्धन देशमुख यांच्यापासून का वेगळे झाले? हाच चर्चेचा विषय सध्या आजीवन सभासदांमध्ये रंगत आहे. नेमकी कुठे माशी शिंकली? याचाही शोध आता आजीवन सभासद घेत आहेत. देशमुख आणि ठाकरे यांच्यात राजकीय, वैचारिक मतभेद असू शकतात; पण गत पाच वर्षे दोघेही सोबत होते. अचानक शेवटच्या क्षणी ठाकरे यांनी वेगळी चूल का मांडण्याचा विचार केला, यात बरेच काही दडले आहे. त्यामुळे ‘शिवाजी’त ‘देखो आगे-आगे होता है क्या?’ असे बोलले जात आहे.

Web Title: 'Shivaji' will feature 'Vikas' versus 'Pragati'; 'Harshvardhan Deshmukh Raj' or 'Nareshchandra Thackeray Shahi'? A decision will be made in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.