दहा महिन्यात उभारणार शिवटेकडीवर शिवरायांचा पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:01 AM2019-07-17T00:01:18+5:302019-07-17T00:01:42+5:30
येथील शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा १२ फुटांचा अश्वारूढ पुतळा दहा महिन्यांच्या आत उभारला जाणार असल्याची माहिती शिल्पकारांनी समितीला दिली. या विषयाच्या अनुषंगाने महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीची बैठक मंगळवारी पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा १२ फुटांचा अश्वारूढ पुतळा दहा महिन्यांच्या आत उभारला जाणार असल्याची माहिती शिल्पकारांनी समितीला दिली. या विषयाच्या अनुषंगाने महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीची बैठक मंगळवारी पार पडली.
शिवटेकडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नव्याने बसवायचा असल्याने त्याकरिता लागणाºया चबुतºयाचे डिझाइन आर्किटेक्ट सुशील खंडारकर यांनी समितीच्या बैठकीत उपलब्ध केले. या बैठकीला उपमहापौर संध्या टिकले, महापालिका आयुक्त संजय निपाणे, सभागृहनेता सुनील काळे, अपक्ष गटनेता दिनेश बूब, माजी महापौर मिलिंद चिमोटे, उपायुक्त महेश देशमुख, नरेंद्र वानखडे, शहर अभियंता रवींद्र पवार, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता प्रमोद इंगोले, भास्कर तिरपुडे, अभियंता दिनेश हंबर्डे, लक्ष्मण पावडे उपस्थित होते.
आर्टिस्ट मे. शिल्पाज आर्ट वर्क या संस्थेला शिवाजी महाराज यांचा पुतळा बनविण्याचे काम देण्यात आले आहे. स्थायी समितीने सदर कामाला मंजुरी दिलेली आहे. महापौर संजय नरवणे यांनी सदर संस्थेला सदर काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. सदर संस्थेने पुतळा बनवायला साधारणत: दहा महिने लागणार असल्याचे यावेळी सांगितले. या संस्थेला कार्यारंभ आदेश दिलेला असून, त्यांच्यासोबत करार करण्यात आलेला आहे. आचारसंहितेमुळे यापूर्वी समितीच्या बैठकी रद्द झाल्या होत्या. मात्र, आता या प्रक्रियेने वेग घेतला आहे.
समितीद्वारे स्थळ पाहणी
शिवटेकडी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा बसविण्याकरिता लागणाºया चबुतºयाचा आराखडा, नकाशा आर्किटेक्ट सुशील खंडारकर यांच्याकडून प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने पुतळा समितीने शिवटेकडी येथे पाहणी करून सुशील खंडारकर यांना सूचना दिल्या. चबुतºयाबाबत नवीन प्रकारच्या डिझाईन तयार करुन समितीसमोर मंजुरीकरिता सादर करण्याचे सांगण्यात आले. पुतळा समितीने पाहणीदरम्यान या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा केली. या परिसरात रंगीबेरंगी फुलांची झाडे लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.