जिल्ह्यात २३ केंद्रांवर गरजूंना शिवभोजन थाळीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:12 AM2021-04-17T04:12:31+5:302021-04-17T04:12:31+5:30
अमरावती : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. याच काळात गरीब गरजूंची उपासमार होऊ नये, यासाठी ...
अमरावती : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. याच काळात गरीब गरजूंची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाने मोफत शिवभोजन थाळीची व्यवस्था विविध केंद्रांवर केली आहे. जिल्ह्यात २३ केंद्रांवर या विशेष उपक्रमाची अंमलबजावणी १४ एप्रिलपासून सुरू झाली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन कार्यक्रम आखला आहे. बुधवार, १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजतापासून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. दरम्यान हे करतानाच दुर्बल घटकाच्या अडचणी रोखण्यासाठी त्यांना विविध पॅकेज शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. गरिबांची जेवणासाठीची समस्या थांबविण्यासाठी शिवभोजन योजनेतून प्रत्येक केंद्रावर मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गतवर्षी २६ जानेवारीपासून ही योजना आघाडी सरकारने सुरू केली. त्यानुसार प्रत्यक्षात शिवभोजन केंद्र सुरू झाले. या केंद्रात ठरवून दिलेल्या वेळेत येणाऱ्या नागरिकांना सर्व केंद्र मिळून २,५०० थाळीचा लाभ दिला जात आहे. यापूर्वी लाभार्थ्यांकडून ५ रुपये घेतले जात होते. मात्र, १५ एप्रिलपासून मोफत सुविधेचा लाभाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
बॉक्स
महा अन्नपूर्णा ॲपवर माहिती संकलन
या योजनेंतर्गत मिळणाऱ्या थाळीत ३०० ग्रॅमच्या दोन चपाती, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात,१०० ग्रॅम वरण दिले जात आहे. प्रत्येक केंद्राला गरजू लोकांनाच थाळी देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा फोटो केंद्र चालकांकडून काढला जातो. तो फोटो अन्नपूर्णा ॲपवर केंद्रचालकाकडून डाउनलोड केले जातात. त्यावरून प्रत्येक केंद्रात दररोज किती लोकांनी लाभ घेतला याची माहिती संकलित होतील, अशी माहिती केंद्राच्या संचालकांनी दिली.
बॉक्स
जिल्ह्यात असे आहेत शिवभोजन केंद्र
अमरावती ५, दर्यापूर २, अचलपूर २, नांदगाव खंडेश्र्वर २, तिवसा १, धारणी १, चांदूर बाजार १, चांदूर रेल्वे १, भातकुली १, अंजनगाव सुर्जी १, धामणगाव रेल्वे २, चिखलदरा १, वरूड १ आणि मोर्शी १ असे एकूण २३ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत.