शिवभोजन योजनेचा लक्ष्यांक दुपटीने वाढणार, जिल्ह्यांकडून मागवले प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 05:14 PM2020-02-13T17:14:09+5:302020-02-13T17:19:10+5:30
गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याची शासन योजनेची राज्यात २६ जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.
अमरावती : शिवभोजन योजनेचा लक्ष्यांक दुपटीने करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. यासाठी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांद्वारा जिल्हा पुरवठा अधिका-यांना अभिप्राय मागविले आहे. त्यानुसार पश्चिम विदर्भात केंद्रसंख्येत ४ ने वाढ व अस्तित्वातील केंद्रात थाळ्यांच्या संख्यावाढीचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहे. यानुसार पश्चिम विदर्भात ९५० थाळ्यांची संख्यावाढ अपेक्षित आहे.
गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याची शासन योजनेची राज्यात २६ जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली. यामध्ये १० रुपयांमध्ये शासकीय अनुदानप्राप्त भोजनालयातून २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी भात व १ वाटी वरण समाविष्ट असलेली थाळी उपलब्ध करण्यात आलेली आहे. योजनेला वाढता प्रतिसाद असल्याने तासभरात शिवभोजनाचा लाभ बंद करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शिवभोजन सुरू असलेल्या केंद्रांमध्ये अपेक्षित वाढींची संख्या व यासोबतच जिल्हा रुग्णालये, बसस्थानके, रेल्वे स्टेशन परिसर, बाजारपेठा, शासकीय कार्यालये याठिकाणची मागणी व वर्दळीचे ठिकाण यांचा सर्वंकक्ष अभ्यास करून पुरवठा विभागाने जिल्हास्तरावरून तत्काळ अहवाल मागितले आहेत.
यासोबतच संबंधित शहरात ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू झालेली आहेत, त्या केंद्रांची अपेक्षित वाढीव थाळींची संख्या आणि अपेक्षित वाढीव केंद्रांमधील थाळींची संख्या याची बेरीज ही मंजूर केलेल्या थाळीसंख्येच्या दुपटीपेक्षा अधिक व कमीही नसावी व अस्तित्वातील व नवीन केंद्रातील थाळीची संख्या ही २०० च्या मर्यादेत असावी, असे पुरवठा विभागाचे अवर सचिवांनी स्पष्ट केले.
शिवथाळींची जिल्हानिहाय वाढ
अमरावती जिल्ह्यात ३ नवीन केंद्रांची वाढ व ४०० थाळी संख्या, अकोला जिल्ह्यात २ नवीन केंद्र व ३०० थाळी, वाशीम जिल्ह्यात अस्तित्वातील २ केंद्रात १०० थाळींनी वाढ, यवतमाळ जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ३ केंद्रांमध्ये १०० थाळ्यांची संख्यावाढ व बुलडाणा जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या ३ केंद्रांपैकी १ केंद्रात ५० थाळींनी संख्यावाढ आवश्यक असल्याचा अहवाल विभागीय आयुक्तस्तरावश्रून पाठविण्यात आल्याची माहिती आहे.