शिवसेनेचा चक्काजाम, संभाजी ब्रिगेडचे आक्रमक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:36 AM2018-05-18T01:36:09+5:302018-05-18T01:36:09+5:30
नाफेडच्या रांगेत ताटकळणाऱ्या तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा शिवसेनेचा चक्काजाम, संभाजी ब्रिगेडचे आक्रमक आंदोलन करीत शासनदरबारी मांडली. शिवसेनेचे २५ कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले. संभाजी ब्रिगेडने बबलू देशमुखांचे वाहन रोखले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : नाफेडच्या रांगेत ताटकळणाऱ्या तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा शिवसेनेचा चक्काजाम, संभाजी ब्रिगेडचे आक्रमक आंदोलन करीत शासनदरबारी मांडली. शिवसेनेचे २५ कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले. संभाजी ब्रिगेडने बबलू देशमुखांचे वाहन रोखले होते.
नाफेडची खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी करीत शिवसेनेने शेतकऱ्यांना सोबत घेऊन बाजार समितीसमोर गुरुवारी चक्काजाम केला. शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृवात गणेश साखरे, बबनराव विल्लेकर , बालू बायस्कार, रवि कोरडे, जगदीश विल्हेकर, नीलेश मोहोड, विनोद तराळ, गजानन चांदूरकर यांच्यासह शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते. शासकीय आदेश येईपर्यंत हटणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. यावेळी अकोट, अकोला, अंजनगाव, परतवाडा मार्ग रोखून धरल्याने वाहतूक तब्बल एक तास खोळंबली होती. पोलिसांनी २५ आंदोलकांना ताब्यात घेतले.
संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक अभय गावंडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर गुरुवारी रास्ता रोको करण्यात आले. कार्यकर्त्यांनी अचानक तहसीलसमोरील वाहतूक रोखून धरली, तर काहींनी तहसीलदारांच्या दालनात आंदोलन केले. यावेळी लग्न समारंभातून परतणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे वाहन आंदोलकांनी अडविले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनावर दबाव टाकण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडने केले.
यावेळी अभय गावंडे, अरविंद घाटे, नमित हुतके, विकास कुलट, मंगेश बोडखे, महेश डाहेकर, सागर राऊत, वैभव ठाकरे, गणेश कराले, कौस्तुभ पानझाडे, वैभव तिमाने, चंदू वसू आदी सहभागी झाले.