अमरावतीहून दर्यापूर मार्गे अकोल्याला प्रथमच ‘शिवशाही’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 05:00 AM2021-06-07T05:00:00+5:302021-06-07T05:00:34+5:30
अकोल्याला मूूर्तिजापूर मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे अमरावतीवरून अकोल्याला जाणारी वाहतूक ही दर्यापूर मार्गे वळली आहे. ‘हायब्रिड ॲन्युईटी’ अंतर्गत वलगाव-दर्यापूर व दर्यापूर-अकोला मार्ग नवीन तयार करण्यात आला. दृष्ट लागावी असा हा रस्ता झाल्यामुळे या मार्गाने प्रवास करण्यास कुणालाही आवडेल. आतापर्यंत दर्यापूरवरून एसटी महामंडळाच्या साधारण (लाल) बस अकोलाकरिता सुटायच्या.
संदीप मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘लाल परी’नंतर प्रवाशआंची सर्वाधिक पसंती लाभलेल्या शिवशाही बस मंगळवारपासून अमरावती मध्यवर्ती आगारातून इतर जिल्ह्यांत सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. एकूण सहा बसपैकी एक अमरावतीहून अकोल्याला दर्यापूर, म्हैसांग मार्गे प्रथमच सुरू करण्यात येत आहे. हा रस्ता ही महिन्यांपूर्वीच गुळगुळीत झाला आहे.
अकोल्याला मूूर्तिजापूर मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे अमरावतीवरून अकोल्याला जाणारी वाहतूक ही दर्यापूर मार्गे वळली आहे. ‘हायब्रिड ॲन्युईटी’ अंतर्गत वलगाव-दर्यापूर व दर्यापूर-अकोला मार्ग नवीन तयार करण्यात आला. दृष्ट लागावी असा हा रस्ता झाल्यामुळे या मार्गाने प्रवास करण्यास कुणालाही आवडेल. आतापर्यंत दर्यापूरवरून एसटी महामंडळाच्या साधारण (लाल) बस अकोलाकरिता सुटायच्या. मात्र, आता रस्ता गुळगुळीत झाल्यामुळे या मार्गावरुन प्रवासी व वाहनांची संख्या वाढली आहे. दर्यापूरहून जाणारे नोकरदार व किराणा व्यावसायिकांची बाजारपेठसुद्धा अकोला आहे. त्यामुळे शिवशाही बसला या मार्गावर प्रवासी मिळतील, हे निश्चित.
मंगळवारी सकाळी ८ वाजता शिवशाही बस अमरावतीहून निघेल. ९.३० वाजता ही बस दर्यापूवरून अकोल्याला रवाना होईल. या मार्गावरील हा पहिलाच प्रयोग आहे.
नागपूरकरिता चार शिवशाही बस
अमरावती मध्यवर्ती आगारातून सहा शिवशाही बस सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. यामध्ये चार शिवशाही बस नागपूरकरिता, तर दोन अकोल्याकरिता सोडल्या जातील. ॲनलॉकमध्ये प्रवासी संख्या वाढल्यानंतर बस वाढविण्यात येतील.
पूर्वी व्हायच्या १७०० फेऱ्या
कोरोनापूर्वी जिल्ह्यातील ३७५ बसच्या १६०० ते १७०० फेऱ्या व्हायच्या. यामध्ये ७३ शिवशाही बस आहेत. आता कोविड नियमावलीनुसार १५० ते २५० बस विविध मार्गांवर सोडण्यात येणार असून, त्याच्या ५०० ते ६०० फेऱ्या होणार आहेत. सोमवारपासून जिल्हा व तालुका पातळीवर बस सोडण्यात येतील. तूर्तास ग्रामीण भागात बस धावणार नसल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी स्पष्ट केले.
एसटीला रोज ३० लाखांचा फटका
कोरोना काळापूर्वी एसटीला रोज ३० ते ३५ लाखांचे उत्पन्न मिळायचे. मात्र, पहिल्या लॉकडाऊनमध्ये सहा महिने एसटीची चाके थांबली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येसुद्धा प्रवासी नव्हते. आता अनलॉकमध्ये फक्त दोन ते तीन लाखांचे उत्पन्न मिळत आहे. एसटीला दररोज ३० ते ३२ लाखांचा फटका बसत आहे.