‘शिवशाही’ केवळ वातानुकूलित, पण सुरक्षिततेचा अभाव; दुरुस्तीसाठी साहित्य मिळेना
By जितेंद्र दखने | Published: April 18, 2023 06:17 PM2023-04-18T18:17:27+5:302023-04-18T18:17:53+5:30
Amravati News एसटी महामंडळात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस सुविधांपेक्षा अपघात व आगीच्या घटनांमुळे जास्त चर्चेत आहे.
जितेंद्र दखने
अमरावती : एसटी महामंडळात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस सुविधांपेक्षा अपघात व आगीच्या घटनांमुळे जास्त चर्चेत आहे. साडेचार वर्षांपूर्वी शिवशाही बससेवेत आल्यापासून होत असलेले अपघात, आगीचे सत्र थांबलेले नाही. गत काही दिवसांपूर्वीच अमरावती ते नागपूर मार्गावर प्रवासी घेऊन जाणारी शिवशाही बस जळून खाक झाली आहे, तर अमरावती विभागात गत दोन वर्षांत शिवशाही बसचे नऊ अपघात झाले आहेत.
या घटनेतील शिवशाही बसेस एसटी महामंडळाच्या मालकीच्या आहेत. असे असतानाही शिवशाही बसेसची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. अनेक बसेसची वेळेवर मेंटेनन्सची कामे होत नाही. याशिवाय प्रशिक्षित मेकॅनिकलचा अभाव आहे. नादुरुस्त असलेल्या बसेसला वेळेवर आवश्यक साहित्य उलपब्ध होत नसल्याने आजही अमरावती विभागातील ४५ शिवशाही बसेसपैकी ३० गाड्यांचा रस्त्यावर धावत आहेत, तर १५ बसेस नादुरुस्त असल्याने आगारात उभ्या आहेत. महामंडळाला उपलब्ध असलेल्या शिवशाही बसगाड्यांमधील सुरक्षिततेच्या अभावामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
एसटी महामंडळाने जून २०१७ मध्ये शिवशाही या वातानुकूलित बस दाखल केल्या. यात स्वमालकीच्या बसचा समावेश आहे. प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर शिवशाहीला प्रथम अपघातांनी गालबोट लागले. आजघडीला अपघात घटले तरी त्याला पूर्णपणे आळा बसला नाही. सुरुवातील बसेसमध्ये प्रवाशांच्या सोईसाठी एसी, सीसीटीव्ही कॅमेरे, सुसज्ज आसनव्यवस्था, सुरक्षिततेसाठी अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. मात्र या बसेसमधील सोयी-सुविधांचा अल्पावधीत बोजवारा उडाला आहे. शिवशाही बसेस नादुरुस्त असल्यास या बसेसला आवश्यक असलेले साहित्य वेळेवर उपलब्ध होत नाही. याशिवाय शिवशाही वातानुकूलित असल्याने मेन्टेनन्स जास्त ठेवावे लागते. यासोबतच वायरिंग मोठ्या प्रमाणात केलेली असते. परिणामी वेळेवर मेन्टेनन्स केले नाही तर बसेस जळण्याची जास्त शक्यता असते. असे असताना तज्ज्ञ मेकॅनिकल व आवश्यक देखभाल दुरुस्तीचे साहित्य उपलब्ध होत नसल्याने शिवशाहीचा गारेगार प्रवास हा डोकेदुखी ठरू लागला आहे.
स्वमालकीच्या बसेस त्यातही नादुरुस्त
अमरावती विभागात ४५ शिवशाही बसेस स्वमालकीच्या आहेत. मात्र ४५ पैकी १५ बसेस आजही नादुरुस्त आहेत. या बसेसला दुरुस्तीसाठी लागणारे मटेरियल वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे शिवशाही बसेसची चाके थांबलेली आहेत.
मेकॅनिक आहेत, पण साहित्य नाही
शिवशाही बस ही १२ टन एवढ्या वजनाची आहे. या गाड्यांची सर्व यंत्रणा ही अत्याधुनिक असल्याने गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाला तर यासाठी महामंडळाच्या वर्कशॉपमधील मेकॅनिकला प्रशिक्षण देऊन गाड्या दुरुस्त केल्या जातात. मात्र गाड्या दुरुस्त करताना लागणारे आवश्यक साहित्य हे वेळेवर उपलब्ध होत नाही. यामुळे बसेस दुरुस्त करताना अडचणी आहेत.
विभागात ४५ शिवशाही बसेस पैकी ३० बसेस प्रवासी सेवेत आहेत. १५ बसेस विविध कारणांमुळे बंद आहेत. त्या दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्याकरिता पाठपुरावा सुरू आहे. दुरुस्तीसाठी प्रशिक्षित मेकॅनिकलची चमू आहे. विभागातील ३० शिवशाही आज चांगल्या स्थितीत आहे. उर्वरित बसेस सुस्थितीत करण्याचे काम सुरू आहे.
नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक